गोव्यात हॉटेलमध्ये डिश सर्व्ह करायचा विशाल, असा बनला शेअर मार्केटचा 'फ्रॉड दलाल'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 01:41 PM2022-01-17T13:41:05+5:302022-01-17T15:52:50+5:30

मागील काही दिवसांपूर्वी त्याच्याच एका गुंतवणूकदाराने जे़ एम़ फायनान्सकडे चाळीस लाख रुपये तुमच्याकडे टाकले असल्याची लेखी तक्रार दिल्यानंतर त्या कंपनीचे पुण्यात खातेच नसल्याचे समोर आले.

Vishal phate became a huge stockbroker, serving dishes in hotels of goa | गोव्यात हॉटेलमध्ये डिश सर्व्ह करायचा विशाल, असा बनला शेअर मार्केटचा 'फ्रॉड दलाल'

गोव्यात हॉटेलमध्ये डिश सर्व्ह करायचा विशाल, असा बनला शेअर मार्केटचा 'फ्रॉड दलाल'

Next

सोलापूर/बार्शी - शेअर मार्केटच्या नावाखाली बार्शीकरांना शेकडो कोटींचा गंडा घालून गेलेल्या विशाल फटेच्या शोधासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची पथके राज्यासह परराज्यातही रवाना झाली आहेत. या घटनेतील मुख्य फिर्यादी दिपक आंबारे यालाही पोलिसांनी सोबत नेले आहे. विशालने शेवटच्या टप्प्यात कित्येक व्यापाऱ्यांना टोपी घातली आहे. अनेकांनी आपली 2 नंबर कमाईची कोट्यवधींची रक्कम त्याच्याकडे जमा केली आहे. मात्र, फिर्याद द्यायची कशी त्यामुळे ते पैसे आमचे नव्हतेच, असेच ते म्हणत आहेत. 

मागील काही दिवसांपूर्वी त्याच्याच एका गुंतवणूकदाराने जे. एम. फायनान्सकडे चाळीस लाख रुपये तुमच्याकडे टाकले असल्याची लेखी तक्रार दिल्यानंतर त्या कंपनीचे पुण्यात खातेच नसल्याचे समोर आले. त्यानंतर विशाल फटे यांच्याकडे एका ब्रोकर कंपनीची फ्रँचायसी होती; मात्र त्या माध्यमातून तो कोणत्याही प्रकारचे ट्रेडिंग करत नव्हता. त्याला जे.एम. फायनान्सियल सर्व्हिसेस या ब्रोकर कंपनीची त्याला फ्रँचायसी घ्यायची होती. तसेच त्याची पत्नी व इतर नातेवाईकांची त्याने जे़ एम़ कडे खातीही ओपन केली होती. जे.एम. फायनान्सचे पुणे विभागीय एरिया मॅनेजर प्रवीण क्षीरसागर हे बार्शीत फटे यांचे कार्यालय पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्याच्याकडे दुसऱ्या ब्रोकर कंपनीची फ्रँचायसी असल्याने जे. एम. नी त्यांचा प्रस्ताव मंजूर केला नाही. 

विशाल फटे यांच्याकडे गुंतवणूक करणारे थोडेसे हुशार गुंतवणूकदार हे आम्हाला तुमच्या विशालका कंपनीत नव्हे तर डायरेक्ट ब्रोकर कंपनीत खाते उघडून पैसे टाकायचे आहेत. त्याठिकाणी तुम्ही अल्गो ट्रेडिंग करा असे म्हणत होते आणि दुसरीकडे जे़ एम़ ने त्याला फ्रँचायसी नाकारली़ त्यामुळे आपल्याकडे येणारा पैशाचा ओघ कमी होऊ शकतो याची कल्पना आल्याने त्याने जे़ एम़ फायनान्सच्या नावे बोगस अकाऊंट उघडण्याचा प्लॅन आखला व त्याने पुण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे व शिक्क्याच्या आधारे खाते उघडले. त्या खात्यात कोट्यवधी रुपयांच्या रकमा घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुंतवणूकदारांना आपण डायरेक्ट जे़ ए़ च्या अकाऊंटला पैसे टाकल्यामुळे आपण सेफ आहोत असे वाटत गेले. मागील काही दिवसांपूर्वी त्याच्याच एका गुंतवणूकदाराने जे. एम. फायनान्सकडे चाळीस लाख रुपये तुमच्याकडे टाकले असल्याची लेखी तक्रार दिल्यानंतर जे. एम.च्या ही बाब लक्षात आली. कारण कंपनीचे पुण्यात खातेच नव्हते. आता जे़ एम़ फायनान्सने एचडीएफसी बँकेकडे याबाबत खुलासा मागविला आहे.

गोव्यात वेटर म्हणून करत होता काम

विशाल फटे याला त्याच्या आई-वडिलांनी मंगळवेढा येथे कॉम्प्युटर सेंटर सुरू करून दिले होते; मात्र तो व्यवस्थित चालवू शकला नाही. कालांतराने ते बंद पडले़ तसेच तो पूर्वी दारू, मटण अशा अनेक व्यवसायात होता़ मागील पाच-सहा वर्षांपूर्वी तो घर सोडून गोव्याला गेला होता़ त्याठिकाणी एका हॉटेलमध्ये तो वेटर म्हणून काम करीत होता़ त्याचे इंग्रजी चांगले असल्यामुळे मालकाने त्याला मॅनेजर म्हणून जबाबदारी दिली होती व पुढे तो बार्शीत आला होता़

मुंबईत सापडल्याच्या अफवा

आज दिवसभर सोशल मीडियावर विशाल फटे हा मुंबईत सापडला असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती; मात्र तो अद्याप सापडलेला नाही़ पोलीस तपास करत आहेत़ कोणी अशा अफवा पसरवून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणू नये़ अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिला आहे़

गुंतवणूकदारांना पैसे काढण्यापासून रोखायचा

कित्येक गुंतवणूकदारांना तो व्यवहाराचा हिशोब केल्यानंतर आता तुम्हाला लागणार आहे. तेवढी रक्कम काढा़ उगीच पैसे काढून नुकसान कशाला करुन घेता़ या आठवड्यात आणखी एक आयपीओ येणार आहे़ त्यामध्ये चांगले रिटर्न मिळणार आहेत़ त्यामुळे तुम्हाला जेव्हा पैसे लागतील, तेंव्हा मला सांगा मी तत्काळ पैसे देतो, असे म्हणत असे त्यामुळे बहुतांश गुंतवणूकदारांनी आपल्याला पाहिजे तेव्हा पैसे मिळत आहेत, म्हणून त्याच्याकडून पैसे काढलेच नाहीत.

प्रत्येक दहा तारखेला पैसे नेण्यासाठी गर्दी

मागील काही महिन्यांपूर्वी दहा तारखेच्या जवळपास त्याच्या दारात महिन्याच्या हिशोबाचे पैसे नेण्यासाठी ग्राहक गर्दी करायचे़ तो कोणाला कॅश तर कोणाला चेक अशा स्वरुपात कोट्यवधी रुपये वाटप करीत होता़ त्याच्याकडे गुंतवणूक करणाऱ्यामध्ये एम़ आर. लोकांचीही संख्या मोठी होती.

पैसे मागितल्यास पुन्हा घेत नसल्याचे सांगायचा

गेल्या दोन महिन्यापासून जर कोणी त्याला चिकाटीने हिशोबाचे पैसे मागायला लागला तर मी तुला नारळ देताे असे म्हणायचा़ तसेच मी एकदा पैसे परत दिल्यानंतर पुन्हा गुंतवणुकीसाठी पैसे घेत नसतो असे म्हणून तो काहीना घाबरवत देखील होता़, असेही काहींनी सांगितले.
 

Web Title: Vishal phate became a huge stockbroker, serving dishes in hotels of goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.