धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:23 PM2021-06-22T14:23:51+5:302021-06-22T14:34:28+5:30

Ram Mandir : राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

uttar pradesh police arrests five accused of creating fake ram mandir website to take donations | धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये

धक्कादायक! राम मंदिराच्या नावाने मोठी फसवणूक; बोगस वेबसाईट तयार करून उकळले लाखो रुपये

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्येराम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) खरेदी केलेल्या जमिनीतील घोटाळ्यासंदर्भात एकामागून एक नवीन खुलासे करण्यात येत आहेत. यावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेससह आम आदमी पार्टी राम मंदिर ट्रस्टच्या आरोपी विश्वस्तांसह भाजपा नेत्यांवर निशाणा साधताना दिसून येत आहे. याच दरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट वेबसाईट तयार करून देणगीच्या नावाखाली रामभक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

राम मंदिराच्या नावाने बनावट वेबसाईट सुरू करून लोकांकडून देणगीच्या नावाखाली पैसे उकळणे सुरू असल्याची बाब निदर्शनास आली आहे. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली. राम मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करणाऱ्यांना सोमवारी अटक करण्यात आली. नोएडा सायबर पोलीस ठाणे आणि लखनौ सायबर क्राईम मुख्यालयातील पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने वेबसाईट सुरू केली होती. ही वेबसाईट बेकायदेशीरपणे सुरू करण्यात आली होती. राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक स्वरुपात योगदान देऊ इच्छिणाऱ्यांसाठी बँकेचा खाते क्रमांक देण्यात आलेला होता. त्याचबरोबर इतरही माहिती होती, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

आरोपींनी बोगस वेबसाईटच्या माध्यमातून आणि राम मंदिराच्या नावाखाली देणगीदारांकडून लाखो रुपये उकळले. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांची ओळख देखील पटवण्यात आली आहे. आशिष गुप्ता (21), नवीन कुमार सिंग (26), सुमित कुमार (22), अमित झा (24) आणि सूरज गुप्ता (22) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्याकडून पाच मोबाईल जप्त केले. त्याचबरोबर एक लॅपटॉप आणि आधार कार्डच्या 50 प्रतीसह इतरही साहित्य ताब्यात घेतलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा राम मंदिरासाठी खरेदी करण्यात येत असलेल्या जमीन घोटाळ्यासंदर्भातील इतर पुरावे सादर केले आहेत. तसेच,अयोध्यामधील भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित लोकांवर स्वस्त दराने जमीन खरेदी केल्याचा आणि राम मंदिर ट्रस्टला अनेक पटींनी विकल्याचा केल्याचा आरोप केला आहे. राजधानी लखनौमध्ये संजय सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अयोध्येत भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय यांचे पुतणे दीप नारायण यांच्याकडून 20 फेब्रुवारी 2021 रोजी अवघ्या 20 लाख रुपयात खरेदी केली होती. मग ती राम मंदिर ट्रस्टला 11 मे 2021 रोजी अडीच कोटींमध्ये विकली. त्याचप्रमाणे अयोध्याच्या कोट रामचंदरमधील जगदीश प्रसाद यांना 14.80 लाखांची जमीन महंत देवेंद्र प्रसाद यांच्याकडून 10 लाख रुपयांना मिळते. मात्र, रामजन्मभूमी ट्रस्टला 1 कोटी 60 लाखांची जमीन 4 कोटींना दिली जाते, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणात भाजपाचे महापौर आणि त्याचा पुतण्या सामील असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.

Web Title: uttar pradesh police arrests five accused of creating fake ram mandir website to take donations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.