TRP Scam: टीआरपी घोटाळा प्रकरण: ‘हंसा’चा आणखी एक माजी कर्मचारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 04:27 AM2020-10-13T04:27:05+5:302020-10-13T06:50:49+5:30

TRP Scam News: उत्तर प्रदेशातून घेतले ताब्यात; पैसे पुरविण्याचे केले काम

TRP scam case: Another former Hansa employee arrested | TRP Scam: टीआरपी घोटाळा प्रकरण: ‘हंसा’चा आणखी एक माजी कर्मचारी अटकेत

TRP Scam: टीआरपी घोटाळा प्रकरण: ‘हंसा’चा आणखी एक माजी कर्मचारी अटकेत

googlenewsNext

मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी हंसा कंपनीच्या आणखीन एका माजी कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर येथून अटक करण्यात आली. विनय त्रिपाठी असे त्याचे नाव असून, याप्रकरणातील ही पाचवी अटक आहे. तो पैसे पुरविण्याचे काम करत होता. यापूर्वी हंसा कंपनीचा विशाल वेद भंडारी (२१), अंधेरीतील बोमपेली नारायण मिस्त्री (४४), बॉक्स सिनेमाचे नारायण नंदकिशोर शर्मा (४७) आणि फक्त मराठीचे शिरीष सतीश पत्तनशेट्टी (४४) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या चौकशीतून तपास पथक राजस्थान, उत्तरप्रदेशसह सात राज्यात रवाना झाले होते.

टीआरपी घोटाळात त्रिपाठी हा पाहिजे आरोपी होता. विशाल भंडारीने पथकाला दिलेल्या माहितीत, मार्च २०१९ मध्ये हंसा कंपनीत नोकरीस असताना, नोव्हेबर २०१९ मध्ये त्याला त्रिपाठीने संपर्क करून, मुंबईच्या ज्या घरामध्ये बॅरोमीटर लावलेले आहेत, अशा पाच घरांमध्ये दिवसांतून किमान दोन तास संबंधित टीव्ही चॅनल पाहण्यास उद्युक्त करण्यास सांगितले. त्याबदल्यात त्यांना दोन तासांसाठी दोनशे रुपये देण्याचे आमिष दाखवले. नोव्हेंबर २०१९ ते मे २०२० पर्यंत तो अशा प्रकारे काम करत होता. भंडारी ८३ अकाउंट मॅनेज करत होता. यातील १० अकाऊंट त्यांने पैसे देऊन मॅनेज केले होते. ज्या १० घरांना पैसे देण्यात आले होते, त्यांनी पैसे घेतल्याच मान्य केल्याचेही पोलिसांनी सांगितले.

विशालच्या डायरीमुळे अन्य चॅनेल्स रडारवर
विशाल भंडारीच्या डायरीच्या आधारे पथक तपास करत आहे. यातील १८०० घरांच्या तपशिलासह अन्य एजंट, अन्य वाहिन्यापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.

फक्त मराठी, बॉक्स सिनेमाचे बँक खाते गोठविले
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या फक्त मराठी, बॉक्स सिनेमासह बोमपेली राव मेस्त्रीचे बँक खाते गोठविण्यात आले आहेत. तसेच सोमवारी हंसा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपव्यवस्थापकाचा जबाब नोंदविण्यात आला असून, त्यांच्याकड़ून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. लवकरच संशयाच्या भोवºयात अडकलेल्या वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने (सीआययु) हंसा कंपनीचे सीईओ प्रवीण निझारा, उपव्यवस्थापक नितीन देवकर यांचे जबाब नोंदविले आहेत. त्यांना तपासा संबंधित काही कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहेत. तर रिपब्लिकचे वितरक हेड घनश्याम सिंग आणि सीईओ विकास खानचंदानी यांना साडे पाच वाजता चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. तर दुसरीकडे शिवा सुंदरम यांनी कुटुंबीयांतील आईसह तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ते मंगळवारी मुंबईत आल्यानंतर हजर राहणार असल्याचे सांगितले. त्यांनी चौकशीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. तर चौकशीदरम्यान रिपब्लिकला फक्त जाहिरातीतूनच उत्पन्न मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सीआययूकड़ून वाहिन्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा विचार होत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी सोमवारी केला असून, त्याबाबतची निविदाही जारी करण्यात आली आहे.

Web Title: TRP scam case: Another former Hansa employee arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.