दिल्लीच्या टोळ्यांचे नवी मुंबईत सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 12:29 AM2021-04-19T00:29:23+5:302021-04-19T00:29:28+5:30

तपासाचे आव्हान : कर्ज, नोकरीच्या बहाण्याने गंडा

Traps of Delhi gangs in Navi Mumbai | दिल्लीच्या टोळ्यांचे नवी मुंबईत सापळे

दिल्लीच्या टोळ्यांचे नवी मुंबईत सापळे

Next



लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून नावलौकिक मिळत असलेल्या नवी मुंबईत दिल्लीतले गुन्हेगार डोके वर काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाडोत्री जागेत कार्यालये थाटून बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ही फसवणूक होत आहे. अशाच एका टोळीचा उलगडा वाशी पोलिसांनी केला आहे. 
नोकरी, व्यवसायाच्या बहाण्याने तसेच कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्याचे प्रकार नवी मुंबईत वाढत आहेत. कमर्शियल हब असलेल्या ठिकाणी गाळे भाड्याने घेऊन कार्यालये थाटली जात आहेत. यानंतर जाहिरातबाजी करून सर्वसामान्यांकडून पैसे उकळून पळ काढला जात आहे. अशाच प्रकारे वाशी येथे दोन ठिकाणी भाडोत्री जागेत कॉल  सेंटर चालवले जात होते. तेथून बजाज फायनान्सच्या नावे गरजूंना फोन करून कर्जाचे आमिष दाखवले जात होते, तर कर्ज मंजूर करण्यासाठी आवश्यक प्रक्रियेच्या नावाखाली शुल्क उकळून कर्ज न देता फसवणूक केली जात होती. 
याबाबत प्राप्त तक्रारीद्वारे वाशी पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर या बनावट कॉल सेंटरचे सूत्रधार दिल्लीत असल्याचे समोर आले. त्यानुसार दिल्ली येथे सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात कल्लन मल्लीक (५३) व फैजान मल्लीक (२४) या पिता - पुत्राचा समावेश आहे. त्यांनी मोहम्मद उस्मानी या तिसऱ्या साथीदारासह मिळून वाशीत दोन ठिकाणी भाड्याने गाळे घेतले. त्यानंतर कॉल सेंटरसाठी जाहिरात देऊन कर्मचाऱ्यांची भरती करून बजाज फायनान्सचे बनावट कॉल सेंटर सुरु केले. यादरम्यान ज्या व्यक्ती त्यांच्या जाळ्यात फसतील, त्यांची रक्कम दिल्ली येथील स्वतःच्या खात्यात वळवून घेत असत. 

अनेकांची फसवणूक 
यापूर्वीदेखील नवी मुंबईत ठिकठिकाणी नोकरी, व्यवसाय तसेच कर्जाच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक झाली आहे. त्यातदेखील बहुतांश गुन्हेगार हे राज्याबाहेरील असल्याचे समोर आले आहे. यावरून नवी मुंबई हे राज्याबाहेरील गुन्हेगारांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. मुंबईनंतर नवी मुंबईला उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विशेष महत्व आहे. त्यामुळे नवी मुंबईत नोकरी व्यवसायाच्या शोधात येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याची संधी या टोळ्यांकडून साधली जात आहे. तर गुन्हे केल्यानंतर तत्काळ मूळ राज्यात पळ काढला जात असल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना कसोटी पणाला लावावी लागत आहे.

Web Title: Traps of Delhi gangs in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.