जळगावात कंपनीतून साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 03:28 PM2020-08-04T15:28:59+5:302020-08-04T15:29:31+5:30

या तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Three arrested for stealing materials from company in Jalgaon | जळगावात कंपनीतून साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक

जळगावात कंपनीतून साहित्य चोरणाऱ्या तिघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन १५ हजाराचे साहित्य व २५ हजाराची रिक्षा असा ४० हजाराचा ऐवज जप्त केला.

जळगाव : चिंचोली शिवारातील फ्रिन्स एन्टरप्रायजेस या लोखंडी आसारी बनविण्याच्या कंपनीतून मशनरी स्टँडला लागणारा लोखंडी रोल व बेरींग बॉक्स आदी साहित्याची चोरी करणा-या मनोज लक्ष्मण पवार (४१, रा.शाहू नगर), भरत मधुकर सोनार (२७, रा.सुप्रीम कॉलनी) व प्रशांत पंडितराव साबळे (२६, रा.सुप्रीम कॉलनी) या तिघांना कंपनीच्या वॉचमनच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले आहे. या तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज भिका पाटील (४५,रा.राम मंदिराजवळ, जळगाव) यांच्या मालकीची चिंचोली शिवारात भवानी मातेच्या मंदिराजवळ फ्रिन्स एन्टरप्रायजेस ही लोखंडी आसारी बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीत जगन सोनवणे वॉचमन असून मंगळवारी सकाळी ६ वाजता एका रिक्षात (क्र.एम.एच.१९ व्ही.६६४९) तीन जण कंपनीतील लोंखडी साहित्य भरताना दिसले. सोनवणे यांनी तिघांना पकडून मालकाला तातडीने घटनास्थळी बोलावले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.

हवालदार दिनकर खैरनार, शांताराम पाटील व सिद्धेश्वर डापकर यांनी तिघांना ताब्यात घेऊन १५ हजाराचे साहित्य व २५ हजाराची रिक्षा असा ४० हजाराचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यातील प्रशांत साबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Three arrested for stealing materials from company in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.