The theft gang arrested by police in Kamshet | कामशेत व परिसरात दरोडा घालण्यासाठी आलेली टोळी जेरबंद
कामशेत व परिसरात दरोडा घालण्यासाठी आलेली टोळी जेरबंद

कामशेत : जुना मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत खिंडीच्या अलीकडे सापळा रचून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी कामशेत पोलिसांनी जेरबंद केली. चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.१८ ) रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पाटील, सहायक फोजदार दत्तात्रय खंडागळे, पोलीस हवालदार अजय दरेकर, पोलीस नाईक शिंदे हे कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पांढऱ्या रंगाचे होंडा अमेझ करमधून काही लोक कामशेत गावच्या हद्दीत जुना मुंबई- पुणे महामार्गावर एका ढाब्याच्या जवळ दरोड्यांच्या तयारीत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली. 
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे लेन वर कामशेत खिंडीच्या अलीकडे नाकाबंदी करून चार जणांना ताब्यात घेतले. यात बाबू हुसेन शेख ( वय ३६ रा. वाशी मुंबई ), जितेंद्र अमल सरोज उर्फ मनीश ( वय १९ रा. वाशी मुंबई ), उमेश बाबुराव गायकवाड ( वय १५ रा. वाशी मुंबई ), चांद दत्ता राणे ( वय १४ रा. वाशी मुंबई)यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पाचवा गुरू ( पूर्ण नाव माहीत नाही ) हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. 
कामशेत व आजूबाजूच्या परिसरात दरोड्यांच्या तयारीत असलेल्या या टोळीकडून लोखंडी तलवार, लोखंडी रॉड, लाल मिरचीची पावडर, घातक हत्यारे आणि होंडा अमेझ कार असा एकूण ४००३९५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे करीत आहेत.

Web Title: The theft gang arrested by police in Kamshet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.