नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:34 IST2025-12-09T14:32:49+5:302025-12-09T14:34:34+5:30
घरात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. कुटुंबाने मोठ्या अपेक्षेने आणि उत्साहाने लग्नाच्या सर्व विधी पूर्ण केल्या. पण, नंतर जे झालं..

AI Generated Image
मोठ्या थाटामाटात, कर्ज काढून वराने लग्न केले. घरात आनंदाचे वातावरण होते. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी, मधुचंद्राच्या रात्रीनंतर नववधूने जे केले, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका नववधूने नवरदेव आणि सासरच्या मंडळींना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि घरातून सोने-चांदीचे दागिने व रोकड घेऊन पळ काढला.
गरीब कुटुंबावर दुहेरी संकट
धौलपूर जिल्ह्यातील पिपहेरा गावात राहणारे सोनू दोन दिवसांपूर्वीच लग्न करून नववधूला घरी घेऊन आले होते. घरात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण होते. कुटुंबाने मोठ्या अपेक्षेने आणि उत्साहाने लग्नाच्या सर्व विधी पूर्ण केल्या. सोनूची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे, एका मध्यस्थाच्या मदतीने त्यांनी लग्नाची बोलणी केली. या मध्यस्थाने लग्नासाठी १ लाख २० हजार रुपये घेतले होते. सोनूच्या कुटुंबाने हे पैसे कर्ज काढून जमवले होते. गरिबीतून बाहेर पडत संसार सुरू करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या कुटुंबावर दुसऱ्याच दिवशी मोठे संकट ओढवले.
जेवणातून दिले गुंगीचे औषध; नववधू झाली गायब
घरात विधी पूर्ण झाल्यानंतर वधूच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते. रात्री झोपण्यापूर्वी तिने नवरदेव सोनू आणि सासरच्या घरातील इतर सदस्यांना अन्नातून गुंगीचे औषध खाऊ घातले. काही वेळातच नवरदेव आणि घरातील सर्व सदस्य गाढ झोपले. याचाच फायदा घेत वधूने घरात ठेवलेले सोने-चांदीचे सर्व मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेतली आणि घराबाहेर पडली. पहाटे जेव्हा कुटुंबातील सदस्य बेशुद्धावस्थेतून जागे झाले, तेव्हा त्यांना घरातून मौल्यवान वस्तू आणि नवी नवरी दोघेही गायब असल्याचे पाहून धक्काच बसला.
कुटुंब रुग्णालयात दाखल, पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच पिपहेरा गावात खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नववधूने गुंगीचे औषध दिल्यामुळे बेशुद्ध झालेल्या कुटुंबीयांना पोलिसांनी तातडीने बसई नबाबच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. नवरदेव सोनू आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर सध्या उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी पीडित कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारावर तपास सुरू केला आहे आणि 'लुटेरी दुल्हन' आणि तिला मदत करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. गरीब कुटुंबाला फसवून आणि त्यांना कर्जबाजारी करून फरार झालेल्या या नववधूला पोलीस कधी पकडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.