Ahmednagar : ३७ कोटींच्या विमा रकमेसाठी सर्पदंशाने मनोरुग्णाला मारले, नगर जिल्ह्यातील घटना; स्वत:ला मृत दाखविण्यासाठी बनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:15 AM2021-10-26T06:15:47+5:302021-10-26T06:16:41+5:30

Ahmednagar : कोले तालुक्यातील राजूर येथे २२ एप्रिल २०२१ रोजी ही घटना घडली होती. या गुन्ह्यातील एकूण पाच आरोपींना अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 

Snake bite kills psychiatrist for insurance amount of Rs 37 crore, incident in Nagar district; Pretend to show yourself dead | Ahmednagar : ३७ कोटींच्या विमा रकमेसाठी सर्पदंशाने मनोरुग्णाला मारले, नगर जिल्ह्यातील घटना; स्वत:ला मृत दाखविण्यासाठी बनाव

Ahmednagar : ३७ कोटींच्या विमा रकमेसाठी सर्पदंशाने मनोरुग्णाला मारले, नगर जिल्ह्यातील घटना; स्वत:ला मृत दाखविण्यासाठी बनाव

Next

- अरुण वाघमोडे

अहमदनगर : अमेरिकेतील वास्तव्यात विमा कंपनीकडून उतरविलेल्या ३७ कोटी रुपयांच्या (५० लाख डॉलर) विम्याची रक्कम मिळविण्यासाठी येथील एका व्यक्तीने स्वत:ला मृत दाखविण्यासाठी एका मनोरुग्ण व्यक्तीला सर्पदंश करून ठार मारले. मात्र पोलीस आणि विमा कंपनीच्या चौकशीत विमा धारक व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले. अकोले तालुक्यातील राजूर येथे २२ एप्रिल २०२१ रोजी ही घटना घडली होती. या गुन्ह्यातील एकूण पाच आरोपींना अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. 

मुख्य आरोपी प्रशांत रामहरी चौधरी याच्यासह प्रभाकर भिमाजी वाघचौरे, संदीप तळेकर, हर्षद रघुनाथ लहामगे, हरिश रामनाथ कुलाळ यांना अटक केली आहे. वाघचौरे २० वर्षांपासून अमेरिकेत राहत होता. तेथे तो हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करत होता. जानेवारी २०२१ मध्ये तो भारतात आला. त्यानंतर तो  अकोले तालुक्यातील धामणगावपाट येथे त्याच्या सासुरवाडीला राहत होता. अमेरिकेत असताना वाघचौरे याने ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीचा ३७ कोटी ५७ लाख रुपयांचा जीवन विमा उतरविला होता.

विम्याचे पैसे मिळविण्यासाठी त्याने त्याचे नातेवाईक संदीप तळेकर आणि प्रशांत चौधरी यांना विश्वासात घेऊन सात महिन्यांपूर्वी कट रचला. ठरल्याप्रमाणे वाघचौरे आणि त्याच्या साथीदारांनी धामणगाव आवारी येथील मनोरुग्ण नवनाथ यशवंत आनप (५०) यास २२ एप्रिलला राजूर परिसरात आणून सर्पदंश केला. आनप हे मृत झाल्यानंतर त्यांना राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांचे शवविच्छेदन करून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. राजूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर विम्याचा दावा दाखल केला होता. 

असा रचला कट... कोब्राने केला सर्पदंश 
वाघचौरे याने राजूर येथे एक खोली भाड्याने घेतली. त्याचा साथीदार हर्षद लहामगे याने सर्पदंश करण्यासाठी सापाचे खेळ करणाऱ्यांकडून कोब्रा जातीचा विषारी नाग मिळविला. प्रशांत चौधरी याने नवनाथ आनप या मनोरुग्णाचा शोध घेतला. त्यानंतर हर्षद लहामगे व हरिश कुलाळ यांनी नवनाथला खोलीपासून दूर नेऊन त्याच्या उजव्या पायाला सापाचा चावा दिला. त्यानंतर आरोपींनी मृत व्यक्ती प्रभाकर वाघचौरे असल्याचे दाखवून पुढील प्रक्रिया केली. 

अशी उघडकीस आली घटना 
वाघचौरे हा अमेरिकेत असताना त्याने स्वत:सह त्याच्या पत्नीच्या नावाने विमा उतरविला होता. २०१७ मध्ये पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचे खोटे कागदपत्रे सादर करून त्याने दावा केला होता. मात्र त्याचा खोटारडेपणा समोर आला होता. त्यानंतर वाघचौरेने पुन्हा दावा केल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना संशय आला. चौकशी  अधिकारी पंकज गुप्ता यांनी राजूर पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर चौकशीत गुन्हा उघडकीस आला. 

अमेरिकेतील कंपनीकडून 
५ दशलक्ष डॉलरचा विमा मिळविण्यासाठी मुख्य आरोपी प्रभाकर भीमाजी वाघचौरे याने त्याच्या चार साथीदारांसह वेडसर असलेल्या व्यक्तीचा सर्पदंश करून खून केला. त्यानंतर क्लेम केला होता. संशय आल्याने कंपनीने माहिती दिली. 
- मनोज पाटील, 
जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर

Web Title: Snake bite kills psychiatrist for insurance amount of Rs 37 crore, incident in Nagar district; Pretend to show yourself dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.