Shocking One murder from a misunderstanding | धक्कादायक! गैरसमजुतीतून एकाची हत्या 
धक्कादायक! गैरसमजुतीतून एकाची हत्या 

ठळक मुद्दे पोमण गावातील इंडस्ट्रीयल परिसरात नोकरीच्या शोधात एक अनोळखी पुरुष आला होता. तो पुरुष ज्या घरात पाणी पिण्यासाठी शिरला होता त्या घरात तीनही महिला होत्या.

नालासोपारा - कामण - भिवंडी रोडवरील पोमण गावात गैरसमजुतीमुळे ४० वर्षीय पुरुषाची दोघांनी निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे. खून झाल्यानंतर पुरुषाचा मृतदेह मोकळ्या मैदानात फेकून देण्यात आला होता. वालीव पोलिसांनी खुनाचा गुन्हा, पुरावा नष्ट करणे याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून खून करणाऱ्या दोघांना वालीव पोलिसांनीअटक केले आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय चौगुले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पोमण गावातील इंडस्ट्रीयल परिसरात नोकरीच्या शोधात एक अनोळखी पुरुष आला होता. ऊन आणि गर्मीमुळे तणावात असलेला पुरुष एका घरात पाणी पिण्यासाठी घुसला. मात्र, बाजूलाच बसलेले चिंतामण धर्मा भुरकुंड (४५) आणि पुतण्या साईराज गजानज भुरकुंड (२१) यांना काही वेगळेच वाटल्याने गैरसमज झाला. कारण तो पुरुष ज्या घरात पाणी पिण्यासाठी शिरला होता त्या घरात तीनही महिला होत्या. याच विषयामुळे काका आणि पुतण्याने पाहिले लाकडी दांड्याने मारहाण केली आणि नंतर दगडाने चेचून त्याचा खून करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह काका पुतण्याने उचलून काही अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात फेकून दिला होता. पोलिसांनी काका पुतण्याला अटक केले आहे. ज्याचा खून झाला आहे त्याचे नाव पोलिसांनी संजीव दत्ता (४०) असे सांगितले असून तो आसाम राज्यातील होता. तो या ठिकाणी कंपनीमध्ये नोकरीच्या शोधात आला होता.  

 


Web Title: Shocking One murder from a misunderstanding
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.