सुरक्षेचे कॅमेरे बनले 'ब्लॅकमेलिंग'चे हत्यार; एक्सप्रेस-वेवरील फुटेज चोरून अश्लील व्हिडिओ व्हायरल करत होता मॅनेजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 21:00 IST2025-12-09T20:09:18+5:302025-12-09T21:00:15+5:30
टोल प्लाझाजवळ लावलेल्या सीसीटीव्हीमधून व्हिडीओ काढून लोकांना ब्लॅकमेल करायचा मॅनेजर.

सुरक्षेचे कॅमेरे बनले 'ब्लॅकमेलिंग'चे हत्यार; एक्सप्रेस-वेवरील फुटेज चोरून अश्लील व्हिडिओ व्हायरल करत होता मॅनेजर
Purvanchal Expressway CCTV Video: उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेले हाय-रिझोल्यूशन कॅमेरेच आता त्यांच्या खासगी आयुष्यासाठी धोकादायक ठरले आहेत. टोल प्लाझाजवळ तैनात असलेल्या अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या एका मॅनेजरवर प्रवाशांचे अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करणे आणि ब्लॅकमेलिंगद्वारे लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि खासगी गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कॅमेऱ्यांचा गैरवापर, प्रायव्हसीचा भंग
सुलतानपूर जिल्ह्यातील हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्वांचल एक्सप्रेस-वे टोल प्लाझाजवळ ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सिस्टिमचे व्यवस्थापन पाहणारा असिस्टंट मॅनेजर आशुतोष सरकार याला या कृत्यामुळे बडतर्फ करण्यात आले आहे. आशुतोष सरकारवर आरोप आहे की, तो एक्सप्रेस-वेवर गाड्यांमध्ये थांबलेल्या विवाहित जोडप्यांचे आणि इतर लोकांचे खासगी क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत असे. त्यानंतर हे फुटेज वापरून तो त्यांना ब्लॅकमेल करत असे आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करत असे. इतकेच नाही, तर पैसे मिळाल्यानंतरही तो अनेकदा हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत होता.
ब्लॅकमेलिंग आणि अश्लील व्हिडिओचा बाजार
तक्रारदारानुसार, आरोपी आशुतोष सरकार एक्सप्रेस-वेवरच्या कॅमेऱ्यांचा गैरवापर करत होता. एक्सप्रेस-वेवर थांबणाऱ्या जोडप्यांचे व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करून रोख रक्कम उकळायचा. एक्सप्रेस-वेच्या आसपासच्या गावातील महिला किंवा मुली बाहेर शौचासाठी थांबल्यास त्यांचेही व्हिडिओ काढून तो व्हायरल करत होता. या प्रकारामुळे अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमची गोपनीयता भंग झाली असून, आशुतोष सरकारचे किळसवाणे कृत्य उघड झाले आहे.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तसेच सुलतानपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी लेखी तक्रार दाखल करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवला. तक्रार दाखल झाल्यानंतर, आउटसोर्सिंग कंपनी 'सुपर वेव कम्युनिकेशन अँड इन्फ्रा सल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड'ने आशुतोष सरकारला तात्काळ नोकरीवरून बडतर्फ केले. तक्रार २ डिसेंबरला झाल्यानंतरही मॅनेजरला ३० नोव्हेंबरला बडतर्फ केल्याचे पत्र देण्यात आले. त्यामुळे कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
हा अश्लील व्हिडिओ आणि तक्रार पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लावलेले कॅमेऱ्यातून खासगी व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग केले जात असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आशुतोषशिवाय आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.