Sensational! Brother-in-law murderd with a knife attacked | खळबळजनक! मेव्हण्याने केली भावोजीची चाकूने भोसकून हत्या

खळबळजनक! मेव्हण्याने केली भावोजीची चाकूने भोसकून हत्या

ठळक मुद्देहत्या करणाऱ्या मेव्हण्याला पोलिसांनी पकडले असून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. अचानक घडलेल्या या हत्याकांडामुळे पोलीस ठाण्यात भयाचे वातावरण पसरले आहे.

नालासोपारा - पश्चिमेकडील परिसरात राहणाऱ्या लग्न झालेल्या बहिणीने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने रागाच्या भरात भावाने सोमवारी संध्याकाळी दिवसाढवळ्या नालासोपारा पोलीस ठाण्यातच भावोजीची गळ्यात चाकू भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे नालासोपारा शहरात खळबळ माजली असून दोन्ही परिवारावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर हत्या करणाऱ्या मेव्हण्याला पोलिसांनी पकडले असून हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.

सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे राहणाऱ्या कोमल हिचे नालासोपारा शहरात राहणाऱ्या रिक्षाचालक आकाश कोळेकर (22) याच्या सोबत लग्न झाले होते. रविवारी कोमल हिने कोणत्यातरी कारणावरून घरी किचनमधील पंख्याच्या हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली होती. ही माहिती कोमलच्या घरच्यांना गावी कळल्यावर अंत्यविधीसाठी नालासोपाऱ्यात आले होते. तिच्या घरच्यांनी आकाशच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याने त्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक विनायक माने यांच्याकडे आले होते. सदर घटनेची गंभीरता लक्षात घेता आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून तपासासाठी आणि जबाब घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आकाशला व दोन्ही परिवाराच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले होते. जबाब सुरू असताना अचानक कोमलचा भाऊ आरोपी रवींद्र शंकर काळेल (22) याने खिशात लपवून आणलेला चाकू गळ्यामध्ये भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांनी आकाशला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती केले पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या हत्याकांडामुळे पोलीस ठाण्यात भयाचे वातावरण पसरले आहे.

या घटनेमागील खरी कहाणी

काही वर्षांपूर्वी आकाश आणि कोमल यांचे प्रेमप्रकरण होते म्हणून दोघेही पळून गेले होते. त्यावेळी रवींद्र ने बहिणीला घरी आणून तिचे दुसऱ्यासोबत लग्न केले पण ते लग्न मोडल्यावर दीड वर्षांपूर्वी आकाशसोबत रवींद्रने लग्न लावून दिले होते.

 सदर आरोपी रवींद्र याला कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशीच झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. - सर्जेराव कोळेकर (मयत आकाशचे वडील)

 सदर आरोपीने पोलीस ठाण्यात घुसून चाकूने खून केल्याबद्दल त्याला अटक केली असून पुरावा म्हणून चाकू जप्त केला आहे. या घटनेमध्ये पोलीस फिर्यादी होणार आहे. - विजयकांत सागर (अप्पर पोलीस अधीक्षक, वसई विभाग)

Web Title: Sensational! Brother-in-law murderd with a knife attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.