Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 07:38 AM2021-04-01T07:38:13+5:302021-04-01T07:39:55+5:30

Sachin Vaze Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती.

Sachin Vaze: Shinde recovered from Mulund & Bhandup for Sachin Vaze | Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा

Sachin Vaze : सचिन वाझेसाठी शिंदे करायचा भांडुप, मुलुंडमधून वसुली, माेबाइल, डायरीतून खुलासा

Next

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेने बडतर्फ कॉन्स्टेबल विनायक शिंदेवर भांडुप, मुलुंड परिसरातील हप्ता वसुलीची जबाबदारी सोपविली होती. या परिसरातील ३२  बार व क्लबमधून  तो गेल्या सात महिन्यांपासून वसुली करत होता, अशी माहिती समोर आली आहे. 

 शिंदेच्या मोबाइलमध्ये आणि त्याच्या घरी सापडलेल्या डायरीत हफ्ता वसुली  करणाऱ्या ठिकाणांची यादी मिळाली आहे. ३२ क्लब, बार व लॉजेसची नावे त्यामध्ये असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

एनआयएच्या अटकेत असलेल्या वाझेने शिंदे व क्रिकेट बुकी नरेश गोरच्या  साथीने मनसुख हिरेनची हत्या केल्याचे पुरावे सापडले आहेत. लखन भैया बनावट एन्काऊंटर  प्रकरणात शिक्षा झालेला बडतर्फ कॉन्स्टेबल शिंदे गेल्यावर्षी मे  महिन्यापासून पेरॉलवर बाहेर होता. वाझेच्या संपर्कात राहून त्याने वाझेकडून हप्ता वसुलीचे काम मिळविले होते. दर महिन्याला लाखो रुपये घेऊन तो वाझेला पोहोचवित होता, त्याबदल्यात त्याला कमिशन मिळत असे, अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. 

काझी, ओव्हाळची चौकशी सुरूच
 जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या स्फाेटक कारप्रकरणी सचिन वाझेचे सीयूआयमधील तत्कालीन सहकारी सहायक निरीक्षक रियजुद्दीन काझी व प्रशांत ओव्हाळ यांची एनआयएकडून झाडाझडती सुरूच आहे. 
 बुधवारी त्यांच्याकडे चार तास चौकशी करण्यात आली. त्यांना दररोज कार्यालयात बोलावून वाझेबद्दल आणि स्फोटक कार व हिरेन हत्या प्रकरणातील त्यांच्या सहभागाबद्दल माहिती घेण्यात येत आहे. 

वाझे कशासाठी सिम कार्ड वापरणार याची कल्पना नव्हती 
मुंबई : मैत्रीच्या नात्याने आपण सचिन वाझे व नरेश गोर यांना  मोबाइलचे सिम कार्ड दिले होते, त्याचा वापर ते कशासाठी करणार होते, याची कल्पना नव्हती, अशी माहिती अहमदाबाद येथील किशोर ठक्करने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना (एनआरआय)  दिल्याचे समजते.
 एटीएसकडून मंगळवारी ठक्करला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येशी आपला काहीही संबंध नसून, त्यांना आपण ओळखतही नसल्याचा दावा त्याने केला. ठक्करने वाझे व  विनायक शिंदे यांच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याचे  सांगितले
हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा  एटीएसने केल्यानंतर त्यांचे एक पथक मागच्या आठवड्यात  अहमदाबादला गेले होते. ठक्करला ट्रांझिस्ट रिमांडवर ताब्यात घेऊन मंगळवारी ते मुंबईत  परतले. या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडे वर्ग केल्याने त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
गाेरमुळे झाली  वाझेशी ओळख!
क्रिकेट बुकी नरेश गोर आपल्या परिचयातील असल्याने त्याच्या माध्यमातून वाझेशी ओळख झाली, त्याच्या मागणीवरून सीम कार्ड पाठविले, कार्ड दिल्यानंतर  आपण त्यांच्या संपर्कातही नव्हतो, असे ठक्कर याने चाैकशीत सांगितल्याचे समजते.

Read in English

Web Title: Sachin Vaze: Shinde recovered from Mulund & Bhandup for Sachin Vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.