शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपाचा गल्ला लुटला; पोलिसांची शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 07:58 PM2021-09-14T19:58:14+5:302021-09-14T20:25:52+5:30

Dacoity Case : सोमवारी मध्यरात्री वर्धा मार्गावरच्या आशिष ऑटोमोबाईल्स नामक पेट्रोल पंपावर ही घटना घडली.

Robbed a petrol pump at gunpoint; Police search opretaion started | शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपाचा गल्ला लुटला; पोलिसांची शोधाशोध

शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपाचा गल्ला लुटला; पोलिसांची शोधाशोध

googlenewsNext
ठळक मुद्देपंप बंद करून दोन कर्मचारी घरी निघून गेले तर ब्रम्हानंद शुक्ला आणि आशिषप्रसाद काैशलप्रसाद पांडे हे दोन कर्मचारी दिवसभराचा हिशेब करू लागले. २० तासानंतरही आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते.

नागपूर - घातक शस्त्राचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना मारहाण करत तीन दरोेडेखोरांनी पेट्रोल पंपावरची सव्वादोन लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी मध्यरात्री वर्धा मार्गावरच्या आशिष ऑटोमोबाईल्स नामक पेट्रोल पंपावर ही घटना घडली.

सोमलवाडा चौकाजवळ सोनेगाव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर उज्ज्वलनगरात हा पेट्रोलपंप आहे. गांधीनगरातील रोहन राठोड यांच्या मालकीच्या या पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री १०.३० पर्यंत कर्मचाऱ्यांनी व्यवहार केला. त्यानंतर पंप बंद करून दोन कर्मचारी घरी निघून गेले तर ब्रम्हानंद शुक्ला आणि आशिषप्रसाद काैशलप्रसाद पांडे हे दोन कर्मचारी दिवसभराचा हिशेब करू लागले. २ लाख, ३० हजार रुपयांची रोकड पंपाच्या कॅबिनमधील ड्रॉवरमध्ये ठेवल्यानंतर शुक्ला आणि पांडेने जेवण केले. रात्री १२.३० च्या सुमारास ते झोपण्याच्या तयारीत असताना हातात कुऱ्हाड आणि सुरा घेऊन तीन आरोपी कॅबिनमध्ये शिरले. त्यांनी शुक्ला आणि पांडेला मारहाण करून जीवे मारण्याचा धाक दाखवला तसेच ड्रॉवरमधील २ लाख, ३० हजारांची रोकड घेऊन आरोपी पळून गेले. शुक्ला आणि पांडेने या घटनेची माहिती आधी पंपमालक राठोड यांना कळविली. राठोड यांनी सोनेगाव पोलिसांना सांगितले. त्यानंतर सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर आपल्या ताफ्यासह पंपावर पोहचले. गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक, ठसे तज्ज्ञही पोहचले.


पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी पंपावरील तसेच आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. माहिती कळताच परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनिता साहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनीही पेट्रोल पंप तसेच सोनेगाव ठाण्यात धाव घेतली. पांडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना शोधून काढण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके कामी लावण्यात आली. मात्र, २० तासानंतरही आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते.


सराईत गुन्हेगाराचे कृत्य

२४ तास वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धा मार्गावर ही लुटमार घडवून आणणारे सराईत गुन्हेगार असावे, असा संशय आहे. त्यांनी आपली कार रस्त्याच्या (दुभाजकाच्या) पलिकडे हॉटेल सेंटर पॉइंटजवळ उभी करून ठेवली होती. कारमध्ये आरोपींचे आणखी साथीदार असावे, असाही संशय आहे. घटना घडण्यापूर्वी आपण किंवा आपली कार सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसू नये, यासाठी आरोपींनी पुरेपुर प्रयत्न केल्याचे एकूण घडामोडीवरून दिसून येते.

वर्षभरापुर्वी घडली होती लुटमारीची घटना
या पेट्रोलपंपावर काही महिन्यांपूर्वी लुटमारीची घटना घडली होती. दुचाकीवर आलेल्या आरोपींनी पंपावरच्या कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला करून किरकोळ रक्कम लुटून नेली होती. या घटनेचा आताच्या लुटमारीशी काही संबंध आहे का, त्याचाही तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Robbed a petrol pump at gunpoint; Police search opretaion started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.