२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 22:38 IST2025-12-09T22:31:48+5:302025-12-09T22:38:11+5:30
गुजरातमध्ये सायबर भामट्यांनी एका व्यापाऱ्याला तब्बल २६ कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
Gujarat Cyber Crime: गुंतवणुकीतून लगेचच मोठा परतावा मिळवून देण्याच्या आमिष दाखवून राजकोट येथील एका व्यापाऱ्याला तब्बल २६.६६ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गांधीनगर येथील सायबर सेंटर ऑफ एक्सलन्सने या प्रकरणात त्वरित कारवाई करत ७ आरोपींना अटक केली असून, या रॅकेटमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
व्हॉट्सॲपवरून जिंकला विश्वास
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या टोळीने सुरुवातीला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्यापाऱ्याशी संपर्क साधला आणि अनेक आठवड्यांपर्यंत संवाद साधून त्याचा विश्वास संपादन केला. विश्वास वाढल्यानंतर पुढील फसवणुकीचा कट रचण्यात आला. आरोपींनी "Final-2" नावाचे एक बनावट वेबपेज तयार केले आणि ते कायदेशीर स्टॉक मार्केट गुंतवणूक व्यासपीठ असल्याचा आव आणला. व्यापाऱ्याला या साइटवर नोंदणी करण्यास सांगून, सुरुवातीला केवळ ५०० रुपयांची छोटी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले गेले.
आभासी नफ्याचे आमिष
पहिल्या गुंतवणुकीनंतर आरोपींनी व्यापाऱ्याला आभासी नफा दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी व्यापाऱ्याच्या व्हर्च्युअल वॉलेटमधून ४३,००० रुपये काढून घेतले आणि १०१ डॉलर इतका नफा दाखवला. यामुळे व्यापाऱ्याला खरच पैसे मिळत आहेत असं वाटलं. फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेल्या या व्यापाऱ्याने ऑगस्ट ते ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण २६ कोटी ६६ लाख रुपये जमा केले.
बँक कर्मचाऱ्याचा सहभाग उघड
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, या सायबर फसवणुकीच्या रॅकेटमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचाही सहभाग होता. या कर्मचाऱ्याने योग्य पडताळणी न करता सायबर टोळीसाठी बँक खाती उघडण्यास मदत केली.
चोरीला गेलेला पैसा एटीएम आणि चेकद्वारे काढून घेण्यात आला आणि त्यानंतर एका मोठ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्ककडे हस्तांतरित करण्यात आला. या हस्तांतरण प्रक्रियेत बँक कर्मचाऱ्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा पोलिसांना संशय आहे.
तातडीने कारवाई, ४ कोटी गोठवले
व्यापाऱ्याची तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित पाऊले उचलली आणि संबंधित बँक खाती गोठवली. यामुळे सुमारे ४ कोटी रुपये अधिक नुकसान होण्यापासून वाचले. अटकसत्र सुरू असताना, पोलिसांनी आरोपींकडून ८ मोबाईल फोन, ६ डेबिट कार्ड, दोन चेकबुक, दोन पासबुक आणि एक सिम कार्ड जप्त केले आहेत.
सध्या अटक केलेल्या ७ आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. सायबर सेंटर ऑफ एक्सलन्स देशभरात किती फसव्या खाती उघडली गेली आहेत आणि यामागे आणखी कोणते गुन्हेगार गट सामील आहेत, याचा तपास करत आहे.