'टायगर'च्या एन्काऊंटरने कुख्यात रिंदाच्या दहशतीला पोलिसांचे प्रत्युत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 03:27 PM2019-11-05T15:27:23+5:302019-11-05T15:31:37+5:30

दहशतीच्या सावटाखाली असलेल्या नांदेडकरांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक केले आहे़ 

Police respond to the notorious Rinda terror by gangster 'Tiger' encounter | 'टायगर'च्या एन्काऊंटरने कुख्यात रिंदाच्या दहशतीला पोलिसांचे प्रत्युत्तर

'टायगर'च्या एन्काऊंटरने कुख्यात रिंदाच्या दहशतीला पोलिसांचे प्रत्युत्तर

Next
ठळक मुद्देऊठसूठ खंडणी मागणाऱ्यांना बसणार चाप खंडणी उकळणाऱ्यांना पोलिसांनी गोळीनेच प्रत्युत्तर दिले

नांदेड : शहरात २०१७ पासून कुख्यात रिंदा व त्याच्या सहकाऱ्यांनी सुरु केलेल्या दहशतीला पोलिसांनी एन्काऊंटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे़ त्यामुळे रिंदाच्या नावाने खंडणी उकळणाऱ्यांना मात्र या एन्काऊंटरमुळे चाप बसणार आहे़

शहरातील गुरुद्वारा परिसरात वैयक्तिक वादातून हरविंदरसिंघ उर्फ रिंदा आणि माळी कुटुंबात संघर्ष पेटला होता़ त्यात २०१७ मध्ये बच्चितरसिंघ माळी आणि अवतारसिंघ गाडीवाले अशा दोन युवकांचा दोन दिवसांच्या काळात गोळ्या घालून खून करण्यात आला होता़ तेव्हापासून नांदेडात गोळीबाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती़ त्यामुळे नांदेड पोलीस त्याच्या मागावर होते़ त्यात रिंदा हा पंजाबमध्येही वॉन्टेड आहे़ महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये रिंदावर गंभीर प्रकारचे २५ हून अधिक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़ यापूर्वी माळटेकडी परिसरात रिंदा असल्याची माहिती मिळाल्यानंतर तब्बल ५०० पोलीस कर्मचारी आणि अधिकारी त्याला पकडण्यासाठी गेले होते़ परंतु त्यावेळी रिंदाने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या होत्या़ त्यानंतर रिंदाची दहशत वाढतच गेली़ 

‘अब आओ उडा दुंगा’; धमकावणाऱ्या 'टायगर'चा नांदेड पोलिसांनी केला एन्काऊंटर

शहरातील अनेक मोठे व्यापारी, डॉक्टर यासह उद्योजकांना थेट फोन करुन लाखो रुपयांची खंडणी उकळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती़ खंडणी न दिल्यामुळे तिघांवर गोळीबार करण्यात आला होता़ त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते गोविंद कोकुलवार, तांडा बारचे सुरेश राठोड यांच्यासह अन्य एकाचा समावेश होता़ त्यातील कोकुलवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ त्याचबरोबर डॉ़ कत्रुवार, केशव घोणसे पाटील, बिल्डर बियाणी यांच्यासह अनेकांना खंडणीसाठी रिंदाच्या सहकाऱ्यांनी फोन केले होते़ या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवित त्यांना सरंक्षणही दिले होते़ 

दिवसेंदिवस खंडणी आणि त्यासाठी गोळीबाराच्या घटना घडत असल्यामुळे नांदेडकर चांगलेच दहशतीत होते़ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते़ त्यातच दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या़ त्यानंतर रविवारी रात्री गजबजलेल्या बीक़े़हॉल परिसरात मेट्रो शूजमध्ये घुसलेल्या शेरसिंघ उर्फ टायगर आणि अजय उर्फ भोप्या ढगे या दोघांनी हम रिंदा के आदमी है असे म्हणत कर्मचाऱ्यांना धमकाविले़ त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून महागडे बुट आणि जवळपास २१ हजारांची रोकड लंपास केली होती़ ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती़ त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता़

घटनेनंतर व्यापाऱ्यांनी शटर बंद करुन निषेध नोंदविला होता़ दरम्यान, या घटनेच्या अर्ध्या तासापूर्वीच या दोघांनी नमस्कार चौकातील एका बिअर शॉपीवर धुडगूस घातला होता़ बिअर शॉपीचालकाला बंदुकीचा धाक दाखवून त्या ठिकाणाहून ३० हजार रुपये लंपास केले होते़ या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली होती़ पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास महाराणा प्रतापसिंह चौकात अजय उर्फ भोप्या हा पोलिसांच्या हाती लागला़ तर शेरसिंघ उर्फ शेरा हा पळाला होता़ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेराच्या मागावर होते़ तो बारड रस्त्यावर एका आखाड्यावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला घेरले़ अटकेच्या भीतीने शेरसिंघने पोलिसांच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या़ तर पोलिसांनी झाडलेल्या एका गोळीत शेरसिंघचा मृत्यू झाला़ रिंदाच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांना पोलिसांनी गोळीनेच प्रत्युत्तर दिले आहे़ त्यामुळे  दहशतीच्या सावटाखाली असलेल्या नांदेडकरांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे कौतुक केले आहे़ 

रिंदाच्या नावाने खंडणीचा सपाटा
कुख्यात असलेल्या रिंदाच्या नावाने फोन करुन खंडणी उकळणाऱ्याचा नांदेडात सपाटा सुरु करण्यात आला होता़ याबाबत व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेवून कारवाई करण्याची मागणी केली होती़ परंतु त्यानंतरही अनेकांना खंडणीसाठी फोन आले होते़ खंडणी न दिलेल्यांवर गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत़ आरोपींनी विशेष करुन खंडणी न देणाऱ्यांच्या पायावरच गोळ्या मारल्या़ त्यामुळे शहरात रिंदाच्या नावाची दहशत झाली होती़ 

नेमकेच तारुण्यात आलेले आरोपी
रिंदाच्या नावाने खंडणी मागणारे आरोपी हे नेमकेच तारुण्यात आलेले  आहेत़ यातील अनेकांचे वय हे २० ते २३ वर्षांदरम्यान आहे़ तर काही जण १८ ते २० वर्षांचे आहेत़ सुसाट वेगाने दुचाकी चालविणे आणि शस्त्र              हाताळण्यात ते पारंगत असल्याचे गोळीबाराच्या झालेल्या घटनांवरुन स्पष्ट होते़ तर दुसरीकडे अनेक भुरट्या चोरट्यांनीही रिंदाचे नाव वापरुन खंडणी उकळण्याचा प्रताप केला आहे़ आता मात्र पोलिसांच्या कारवाईने खंडणीखोरांवर वचक बसला आहे़ 

Web Title: Police respond to the notorious Rinda terror by gangster 'Tiger' encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.