नेव्हीतील कमांडरचा एफआयआर घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 06:30 PM2019-07-09T18:30:30+5:302019-07-09T18:37:23+5:30

कफ परेड पोलिसांची दोन महिन्याची चालढकल; अंकांऊटवरील रक्कम परस्पर हडप

Police avoiding to take an FIR of Navy commander | नेव्हीतील कमांडरचा एफआयआर घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

नेव्हीतील कमांडरचा एफआयआर घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

Next
ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेजवरुन काढलेल्या छायचित्रातून चोरट्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. पोलीस ठाण्याच्या प्रभारीच्या उदासिनेतेबाबत आयुक्त बर्वे यांनी लक्ष घालून योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.नेव्हीतील एका कमांडरच्या बॅँक खात्यातून अज्ञाताने परस्पर ९० हजार रुपये काढलेले आहेत.

जमीर काझी
मुंबई - सायबर गुन्ह्यासंबंधी तक्रारीची दखल तातडीने घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिले असताना कफ परेड पोलिसांनी मात्र गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ उलटूनही अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. नेव्हीतील एका कमांडरच्या बॅँक खात्यातून अज्ञाताने परस्पर ९० हजार रुपये काढलेले आहेत, त्याबाबत तक्रार अर्ज देवूनही गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत.
देशाच्या संरक्षण दलात कार्यरत असलेल्या वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीकडे दाखविलेले उदासिनेतमुळे त्यांची ‘तत्परता’ चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तक्रारीबाबत ते किती ‘कार्य तत्पर ’असतील, हे स्पष्ट होत आहे. नौदलाच्या पश्चिम विभागामध्ये कमांडर म्हणून कार्यरत असलेले संजय सोलवट यांच्या आयसीआयसीआय बॅँकेच्या खात्यातून २ मे रोजी सायंकाळी पाच मिनिटाच्या अंतरात लागोपाठ पाच ‘ट्रान्झकशन’ होवून ९० हजार रुपये काढण्यात आले. मोबाईलवर त्याबाबत मॅसेज आल्यानंतर त्यांनी तातडीने बॅँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून डेबिट कार्ड बंद केले. बॅँकेला ईमेल करुन तक्रार नोंदविली. चोरट्याने खात्यावर काढलेल्या रक्कमेच्या व्यवहाराची प्रिंट काढून ३ मे रोजी कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र तेव्हापासून आजतागायत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना सवड मिळालेली नाही. तपास अधिकारी सहाय्यक निरीक्षक जाधव यांनी मागणी केलेल्या सर्व कागदपत्राची पूर्तता केली आहे. त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधून याबाबत सायबर गुन्हे प्रतिबंधक कायद्यातर्गंत गुन्हा दाखल करुन तपास करण्याबाबत विनंती करीत आहेत, मात्र अधिकाऱ्यांकडून दोन महिन्यापासून केवळ आश्वासन देत वेळकाढूपणा केला जात आहे. दरम्यानच्या काळात कमांडर सोलवट यांनी बॅँकेशी संपर्क साधून कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर २८ दिवसानंतर रिझर्व्ह बॅँकेच्या नियमानुसार काढण्यात आलेली रक्कम पुन्हा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. त्याचबरोबर चोरट्याने अहमदाबादेतील एका एटीएम सेंटरमधून ही रक्कम काढल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजवरुन काढलेल्या छायचित्रातून चोरट्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे त्यांनी पुर्ण व्हिडीओ फुटेजची मागणी केली आहे. मात्र आयसीसीआय बॅँकेकडून अद्यापपर्यत ते पाठविण्यात आलेले नाही.

माझ्या खात्यातून काढण्यात आलेली रक्कम बॅँकेकडून परत मिळाली असलीतरी या चोरीचा छडा लागला पाहिजे. अन्यथा पुन्हा असा प्रकार घडू शकतो, त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास करावा, यासाठी आपण बॅँक व पोलिसांकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र त्यांचा प्रतिसाद निराशजनक आहे. -संजय सोलवट ( तक्रारदार व कमांडर, नौदल)


तक्रारीबाबत काय झाले ते बघते
दोन महिने उलटूनही अद्याप गुन्हा दाखल न केल्याबाबत वरिष्ठ निरीक्षक रश्मी जाधव यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्याला याबाबत माहिती नाही, तक्रार अर्ज आल्यानंतर शाहनिशा करुन गुन्हा दाखल केला जातो, याबाबत मी बघते,’असे सांगून त्यांनी फोन कट केला.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक
वांद्रे (प) येथील सायबर क्राईम पोलीस स्टेशन व उपायुक्त कार्यालयाचे भुमीपुजन पंधरवड्यापूर्वी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी त्यांनी सर्वच व्यवहारांचे डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात होत असल्याने सायबर गुन्हे वाढत आहेत. त्यामुळे त्याबाबत अशा तक्रारीकडे पोलिसांनी तातडीने लक्ष घेत नागरिकांची सोडवणूक करा, असे जाहीर सूचना दिल्या होत्या. मात्र, कफ परेड पोलिसांनी सामान्य नागरिक नव्हे तर देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या नेव्ही कमांडरच्या तक्रारीकडे डोळेझाक केले आहे. त्यामुळे असे तपास अधिकारी, पोलीस ठाण्याच्या प्रभारीच्या उदासिनेतेबाबत आयुक्त बर्वे यांनी लक्ष घालून योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.

 

Web Title: Police avoiding to take an FIR of Navy commander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.