Parole absconding accused of Kolhapur jail arrested in Vishrantwadi | कोल्हापूर कारागृहातून पॅरोलवरील फरार आरोपी विश्रांतवाडीत जेरबंद
कोल्हापूर कारागृहातून पॅरोलवरील फरार आरोपी विश्रांतवाडीत जेरबंद

विमाननगर : सांगली येथील खूनाच्या चार गुन्ह्यातील पॅरोलवरील फरार आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. कुख्यात गुंड भरत त्यागी टोळीतील सदस्य धैर्यशील संपतराव कांबळे (वय ४०, रा.सांगली) याला ताब्यात घेऊन कुरळप पोलिस स्टेशनच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोल्हापूर कारागृहातून तो  पॅरोल रजेवर बाहेर होता. पॅरोलची मुदत संपूनही तो परत कारागृहात हजर झाला नव्हता. याप्रकरणी कुरळप पोलिस स्टेशन, सांगली येथे दाखल गुन्ह्यात त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. 
पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली येथील सराईत गुन्हेगार धैर्यशील कांबळे हा शांतीनगर बुध्दविहाराजवळ येणार असल्याची माहिती पोलिस शिपाई अनिकेत भिंगारे यांना मिळाली होती. तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राहूल घुगे यांनी कर्मचार्यांसह सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सांगली येथील कुख्यात गुंड भरत त्यागी टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खूनाचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. खूनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर कारागृहात तो शिक्षा भोगत होता. जून २०१९ पासून  पॅरोल रजेवर तो बाहेर आला होता. मुदतीत कारागृहात न परतल्यामुळे त्याच्या विरुद्ध कुरळप पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हि कबूली दिली. 
अतिरिक्त पोलिस आयुक्त(पूर्व) सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू,सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राहूल घुगे, पोलिस कर्मचारी विजय सावंत, यशवंत किर्वे, प्रविण भालचिम, किशोर दुशिंग, रिहाण पठाण,अनिकेत भिंगारे,प्रफुल्ल मोरे,शेखर खराडे यांच्या पथकाने हि कारवाई केली. या सराईत आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा कुरळप पोलिसांच्या ताब्यात दिले.
 


Web Title: Parole absconding accused of Kolhapur jail arrested in Vishrantwadi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.