Param Bir Singh:Anil Deshmukh's 2 PAs summoned by CBI on charges of recovery of Rs 100 crore | Anil Deshmukh: मोठी बातमी! १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली अनिल देशमुखांच्या २ पीएना CBI कडून समन्स

Anil Deshmukh: मोठी बातमी! १०० कोटी वसुलीच्या आरोपाखाली अनिल देशमुखांच्या २ पीएना CBI कडून समन्स

ठळक मुद्देपरमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी विरोधकांनी केली होतीराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले होतेहायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर नैतिकतेच्या आधारे अनिल देशमुखांनी राजीनामा दिला होता.

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय अन्वेषन विभागाने अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. कुंदन आणि पालांडे या दोन स्वीय सहाय्यकांना CBI ने चौकशीसाठी पाचारण केले आहे. रविवारी सीबीआय या दोघांचे जबाब नोंदवणार असून त्यांच्या चौकशीत काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा अशी मागणी विरोधकांनी केली होती. परंतु राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. हायकोर्टाच्या निर्देशावरून या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.

संजय पांडे करणार परमबीर सिंग यांची चौकशी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरुद्धची प्राथमिक चौकशी नूतन पोलीस महासंचालक संजय पांडे करतील. मुंबई पोलीस आयुक्तांनी त्यांच्याबाबत दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. एनआयएच्या ताब्यातील निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणामुळे आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेला दर महिना १०० कोटी वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा ‘लेटरबॉम्ब’ टाकून राज्य सरकारला अडचणीत आणले. या आरोपाच्या चौकशीचे उच्च न्यायालयाने आदेश सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

त्याडायरीच्या नोंदीची झाडाझडती

सचिन वाझे आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने करीत असलेल्या हप्ता वसुलीची नोंद असलेली डायरी एनआयएने ताब्यात घेतलेली आहे. त्याची पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनिल देशमुख यांचीही लवकरच चौकशी !

वसुलीच्या आरोपानंतर गृहमंत्रीपद गमवाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याकडे याबाबत येत्या एक, दोन दिवसांत चौकशी केली जाणार आहे. साक्षीदारांकडील तपासाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Param Bir Singh:Anil Deshmukh's 2 PAs summoned by CBI on charges of recovery of Rs 100 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.