गुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 06:52 PM2020-01-23T18:52:43+5:302020-01-23T18:54:42+5:30

एलटी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

Offence registered against Goodwin jewelers in Mumbai | गुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

गुडविन ज्वेलर्सविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्दे झवेरी बाजारातील व्यापाऱ्याची ८४ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ९१ लाख किंमतीचे सोने खरेदी करून त्यापैकी अवघ्या ७ लाखांची रक्कम अदा केली. या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : ठाणे, नवी मुंबईसह मुंबईतही गुडविन ज्वेलर्सविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. झवेरी बाजारातील व्यापाऱ्याची ८४ लाख रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानुसार एलटी मार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.

काळाचौकी परिसरात राहणारे सोने व्यापारी दिपेन जैन (२८) यांचा सोन्याचे दागिने झवेरी बाजार तसेच संपूर्ण भारतातील सोन्याच्या बाजारपेठेत विकण्याचा व्यवसाय आहे. २०१६मध्ये गोरेगाव येथे भरलेल्या प्रदर्शनादरम्यान त्यांची मेसर्स गुडविन ज्वेलर्स प्रा. लि.चे सुनीलकुमार मोहनन अकाराकरण व सुधीरकुमार मोहनन अकाराकरण यांच्याशी ओळख झाली. याचदरम्यान दोघांनी त्यांचा विश्वास संपादन करत, सोबत व्यवहार करण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी २०१६ ते २०१८पर्यंत ४ कोटींच्या सोने खरेदीचा व्यवहार केला. त्याच कालावधीत मेसर्स गुडविन ज्वेलर्सने आणखी ४ नवीन ज्वेलरीचे शोरूमही काढले होते. त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास आणखी वाढला. यादरम्यान आक्टोबर २०१८मध्ये सुनीलकुमार याने ३ किलो सोन्याच्या दागिन्यांची आवश्यकता असल्याचे सांगून सुरुवातीला ५० लाखांचे दोन धनादेश पाठविले. दोन्ही धनादेश वठले नाहीत. उर्वरित पैशांबाबत त्यांच्याकडून टाळाटाळ सुरू झाली.


त्यांनी, ९१ लाख किंमतीचे सोने खरेदी करून त्यापैकी अवघ्या ७ लाखांची रक्कम अदा केली. उर्वरित ८४ लाख ३५ हजार खात्यात पैसे न देता फसवणूक केल्याने जैन यांनी सोमवारी एलटी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला. यापूर्वी गुडविनच्या संचालकांविरुद्ध ठाणे, अंबरनाथ, डोंबिवलीत १२०० जणांना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांची दुप्पट पैसे देण्याच्या नावाखाली फसवणूक केली होती.

Web Title: Offence registered against Goodwin jewelers in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.