नागपुरातील कुख्यात कडवच्या पत्नीला अटक : २० लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:59 PM2020-07-06T23:59:01+5:302020-07-07T00:00:49+5:30

कुख्यात मंगेश कडव याच्या बनवाबनवीत साथ देणारी त्याची पत्नी रुचिका मंगेश कडव हिला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या कारवाईमुळे फरार असलेला मंगेश कडव आता लवकरच पोलिसांना शरण येऊ शकतो, असे मानले जात आहे.

Notorious Kadav's wife arrested in Nagpur: Rs 20 lakh grabbed | नागपुरातील कुख्यात कडवच्या पत्नीला अटक : २० लाख हडपले

नागपुरातील कुख्यात कडवच्या पत्नीला अटक : २० लाख हडपले

googlenewsNext
ठळक मुद्देभूखंड दिलाच नाही, धनादेशही वाटले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात मंगेश कडव याच्या बनवाबनवीत साथ देणारी त्याची पत्नी रुचिका मंगेश कडव हिला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. या कारवाईमुळे फरार असलेला मंगेश कडव आता लवकरच पोलिसांना शरण येऊ शकतो, असे मानले जात आहे. ज्या गुन्ह्यात रुचिता मंगेश कडव हिला पोलिसांनी अटक केली तो गुन्हा हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीला भूखंड दाखवून त्याच्याकडून मंगेश कडव याने वीस लाख रुपये घेतले होते. तो भूखंड कडव याचा नसल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित व्यक्तीने त्याला दुसरा भूखंड मागितला असता कडवने नकार देऊन त्याला झुलविणे सुरू केले. नंतर त्याला रुचिका हिच्या खात्याशी संबंधित २० लाख रुपयांचे धनादेश दिले. मात्र ते वटलेच नाहीत. यासंबंधात पीडित व्यक्तीने रुचिकाकडे विचारणा केली असता तिने कानावर हात ठेवले. कडव याने केलेल्या फसवणुकीत तिचाही सहभाग असल्याची तक्रार हुडकेश्वर पोलिस ठाण्यात पीडिताने नोंदवली होती. या पार्श्वभूमीवर मंगेश कडवविरुद्ध गुन्हे शाखेने कारवाईचा बडगा उगारला. त्याच्याविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा, बजाजनगर आणि हुडकेश्वर ठाण्यात गुन्हे दाखल केले. त्याच्याकडून सुमारे दीड कोटी रुपयांची चार वाहनेही जप्त करण्यात आली. त्यात हार्ले डेव्हिडसन, बीएमडब्ल्यू आणि दोन मर्सिडीज कारचा समावेश आहे.
मंगेश कडवला अटक करण्यासाठी पोलिस त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याच्यावरील दबाव वाढवण्यासाठी सोमवारी रुचिका कडवला अटक केली.

सीताबर्डीत आज गुन्हा दाखल होणार
नोकरीचे आमिष दाखवून एका पानटपरी चालकाकडून कडवने सहा लाख रुपये हडपल्याचे स्पष्ट झाले आहे. कडवविरुद्ध याप्रकरणी मंगळवारी सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी लोकमतला दिली.

२४ तासात आत्मसमर्पण
राजकीय प्रभावाखाली कट-कारस्थाने आणि गुन्हेगारी करणाऱ्या मंगेश कडवविरुद्ध पोलिसांनी ठोस कारवाई चालविली आणि त्याच्या पत्नीला अटक केल्यामुळे कडववर चांगलाच दबाव निर्माण झाला असून पुढच्या चोवीस तासात तो आत्मसमर्पण करू शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी लोकमतला दिली आहे. पोलिसांनीही तशी शक्यता वर्तविली आहे.

पोलिसांकडे तक्रारदारांची रीघ
कडवविरुद्ध पोलीस कडक कारवाई करीत असल्याचा विश्वास पटल्यामुळे आता अनेक तक्रारदारांनी गुन्हे शाखेत गर्दी केली आहे. आणखी पाच तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आहेत. त्यांची पडताळणी सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त राजमाने यांनी दिली आहे.

Web Title: Notorious Kadav's wife arrested in Nagpur: Rs 20 lakh grabbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.