Video : सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन, धरण फुटीच्या वक्तव्यावरुन संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 03:28 PM2019-07-05T15:28:46+5:302019-07-05T15:32:09+5:30

हे सरकार बेशरम आहे -आ. जितेंद्र आव्हाड

NCP's crab agitation against Sawant, anger from the statement of the dam breached | Video : सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन, धरण फुटीच्या वक्तव्यावरुन संताप

Video : सावंतांविरुद्ध राष्ट्रवादीचं खेकडा आंदोलन, धरण फुटीच्या वक्तव्यावरुन संताप

googlenewsNext
ठळक मुद्दे या खेकडयांना अटक करा’, असे म्हणत जलसंधारण मंत्री सावंत यांचा अनोखा निषेध केला. हे सरकार बेशरम असल्याचेच सिद्ध होत आहे; त्यांना दुसरा शब्दच नाही, अशी टीकाही आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.   

ठाणे  - खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले; असा दावा जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी चांगलीच चपराक लगावली. नौपाडा पोलिसांना खेकडे देऊन  धरण पोखरणारे हे खेकडे मल्ल्यासारखेच पळून जात होते. त्यांना आम्ही पकडून आणले आहे. या खेकडयांना अटक करा’, असे म्हणत जलसंधारण मंत्री सावंत यांचा अनोखा निषेध केला. दरम्यान, या सरकारच्या दाव्यांकडे पाहून हे सरकार बेशरम असल्याचेच सिद्ध होत आहे; त्यांना दुसरा शब्दच नाही, अशी टीकाही आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.   
खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे तिवरे धरण फुटले, असे ग्रामस्थ आणि अधिकार्‍यांचे मत असल्याचा दावा जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण केली. त्यांच्या या विधानामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या विचित्र दाव्याचा आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध केला.
आ. आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त तडवी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांच्या हातात खेकडे देऊन,‘ जलसंधारण मंत्र्यांनी सांगितलेले हेच ते खेकडे आहेत. यांनीच धरण फोडले आहे. या खेकड्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करा; या खेकड्यांना जेलमध्ये टाका,’ अशी मागणी करीत हे खेकडे पोलिसांच्या ताब्यात दिले. 
यावेळी आ. आव्हाड यांनी, “या सरकारमध्ये संवेदनशीलताच राहिलेली नाही. 23 जण वाहून गेले. अजून 10 जण भेटलेले नाहीत. तरीही, धरण फुटण्यात आमचा काही दोष नाही; हे धरण खेकड्यांनी पाडले, असे सांगून जलसंधारण मंत्री मोकळे झाले. या नालायक सरकारला काय बोलायचे? आमदाराचा भाऊ तिथे कंत्राटदार म्हणून काम करतोय.त्याला अटक करायची नसेल तर नका करु पण, बेशरमसारखे असे काही तरी सांगून मृत आत्म्यांना, त्यांच्या कुटुंबियांना यातना होतील, असे तर बोलू नका. 23 जण दगावलेत; या गावातील लोकांशी आम्ही बोलल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही दोन वर्षे तक्रारी करतोय की या धरणाला भेगा पडल्यात. पण, कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीत. का सरकारी अधिकार्‍यांवर कारवाई होत नाही. 23 माणसांचा जीव घेणार्‍याला सरकार जबाबदार नाही. माणूसकी आहे की नाही महाराष्ट्रात? सरळ एखादा मंत्री सांगतो की खेकड्यांनी धरण फोडले. याला फक्त बेशरम एवढाच शब्द लागू होतो, असे सांगितले.
मंत्र्यांनी राजीनामा द्यावा का, असे पत्रकारांनी विचारले असता, राजीनामा वगैरे लांब राहिले; लोकांच्या प्रती हे किती असंवेदनशील आहेत, याचे हे जीवंत उदाहरण आहेत.  पुण्यात भिंत कोसळली ती उंदरांनी पोखरली; इथे धरण फुटले ते खेकड्यांनी फोडले. म्हणजे, यांच्याकडची सर्व माणसे देवासारखीच आहेत का? असा सवालही आ. आव्हाड यांनी उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादीच्या ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, ज्येष्ठ नागरीक सेलचे  रामदास खोसे, सिल्वेस्टर डिसोजा,हेमंत वाणी,विक्रांत घाग,रवींद्र पालव,निलेश कदम, प्रफुल कांबळे, सुमित गुप्ता,रवींद्र साळुंखे,फिरोज पठाण,दीपक पाटील ,ज्योति निंबरगी,मेहेरबानो पटेल, स्मिता पारकर, वंदना हुंडारे, शुभांगी कोलतकर आदी कार्यकर्तेउपस्थित होते.

Web Title: NCP's crab agitation against Sawant, anger from the statement of the dam breached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.