The names of the martyrs, dead IPS officers were removed from the list; by mistakenly incident happen told director general of police | 'त्या' यादीतून शहीद, मृत अधिकाऱ्यांची नावे हटवली; नजरचुकीने प्रकार घडल्याची पोलीस महासंचालकांची कबुली

'त्या' यादीतून शहीद, मृत अधिकाऱ्यांची नावे हटवली; नजरचुकीने प्रकार घडल्याची पोलीस महासंचालकांची कबुली

ठळक मुद्दे‘लोकमत’ने हा गृह विभाग व पोलीस मुख्यालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. दिवगंत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.

जमीर काझी

मुंबई - २६/११ मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा आयपीएस अशोक कामटे यांच्यासह दिवंगत अधिकारी हिमांशू रॉय, आर.के. सहाय आदींकडून मालमत्तेबाबत माहिती मागविण्याबाबतचा प्रकार घडल्याची कबुली राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दिली आहे. संबंधित प्रकार नजर चुकीने घडला असून त्यांची नावे तातडीने हटविण्यात आली असून संबंधितांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा कसलाही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या ज्या आयपीएस अधिकाऱ्यांनी २०१८ या वर्षात त्यांच्याकडील स्थावर मालमत्तेबाबत माहिती कळविली नव्हती, त्यांना त्याबाबत तातडीने  माहिती कळविण्याची सूचना केंद्रीय गृह विभागाकडून करण्यात आलेली होती. त्या यादीमध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद व अन्य मृत अधिकाऱ्यांचा समावेश होता. ‘लोकमत’ने हा गृह विभाग व पोलीस मुख्यालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. त्याबाबत पोलीस वर्तुळासह सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महासंचालक कार्यालयाने संबंधित यादीच संकेतस्थळावरुन तातडीने हटविली. त्याचप्रमाणे दिवगंत अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.

शहीद अधिकाऱ्याकडे मागितला मालमत्तेचा तपशील; गृह खात्याचा भोंगळ कारभार


पोलीस महासंचालक जायसवाल म्हणाले की,‘ शहीद अशोक कामटे व दिवंगत अधिकाऱ्यांबद्दल आपल्या सर्वांना नितांत आदर आहे. त्यांच्या कुटुंबियांना दुखाविण्याचा कसलाही हेतू नाही. नजर चुकीतून त्यांची नावे आलेली आहेत. तातडीने ती  हटविण्यात आली असून ही यादी अद्यावत करुन त्याबाबत केंद्रीय गृह विभागाकडे माहिती पाठविली जाईल.


 केंद्राने पाठविलेल्या १४ जणांच्या यादीमध्ये  शहीद अशोक कामटे , दिवंगत सर्वश्री आर.के.सहाय, हिमांशू रॉय,आनंद मंड्या,  स्वेच्छा निवृत्ती घेतलेले व्ही. एस. लक्ष्मीनारायण, बडतर्फ मारिया फर्नांडिस, निवृत्त अप्पर महासंचालक भगवंत  मोरे यांचा समावेश होता. गृह विभागाने या यादीची शहानिशा न करता कार्यवाहीसाठी ती पोलीस मुख्यालयाकडे पाठविली. संबंधित अधिकाऱ्यांनी ती व्यवस्थित न पाहता संबंधितांना स्थावर मालमत्तेबाबतची माहिती पाठविण्याबाबत कळविले होती. त्याचप्रमाणे ही यादी पोलीस दलाच्या संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आली होती.

 

शहीद व मृत अधिकाऱ्यांची नावे नजरुचुकीने राहिली होती. त्यामध्ये कुटुंबियांना दुखाविण्याचा  कसलाही हेतू नाही. ही यादी तातडीने   हटविण्यात आली असून  अद्यावत  सुधारीत माहिती  केंद्राकडे पाठविली जाईल. - सुबोध जायसवाल ( पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य)  

 

Web Title: The names of the martyrs, dead IPS officers were removed from the list; by mistakenly incident happen told director general of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.