The murder of vegetable seller in Dhankawadi at Pune | पुण्यातील धनकवडीत भाजी विक्रेत्याबरोबरील भांडणातून एकाचा खुन
पुण्यातील धनकवडीत भाजी विक्रेत्याबरोबरील भांडणातून एकाचा खुन

ठळक मुद्देप्लास्टिक पिशवी ठरली काळ

पुणे : रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्याबरोबर प्लास्टिक पिशवी देण्यावरुन झालेल्या वादातून चाकूने वार करुन खुन करण्याचा प्रकार धनकवडीत घडला़. 
रामदास शामराव शिळीमकर (वय ३८, रा़ धनकवडी) असे खुन झालेल्याचे नाव आहे़. ही घटना धनकवडी येथील शेवटचा बसस्टॉपजवळील योगी सोसायटीसमोरील रोडवर शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला़. याप्रकरणी विकास चव्हाण (वय. ४४, रा़. चव्हाणवाडा, धनकवडी, गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे़. सहकारनगर पोलिसांनी ज्ञानेश्वर वानखेडे व त्याचा भाऊ आणि मेव्हण्यावर गुन्हा दाखल केला आहे़.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ज्ञानेश्वर वानखेडे याचा धनकवडीत फुटपाथवर भाजी विक्रीचा व्यवसाय आहे़. रामदास शिळीमकर व ते गेल्या ७ ते ८ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात़. शिळीमकर हे बांधकामाची छोटी छोटी ठेका घेण्याचे काम करतात़. ते नेहमी वानखेडे यांच्याकडून भाजी घेत असतात़. शुक्रवारी त्यांनी भाजी घेतल्यानंतर प्लॉस्टिक पिशवी देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला़. त्यानंतर शिळीमकर निघून गेले होते़. शिळीमकर, विकास चव्हाण व सुधीर मांगले हे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास योगी पार्क येथील दुकानाबाहेरील रस्त्यावर गप्पा मारत होते़. त्यावेळी वानखेडे व त्याचे नातेवाईक तेथे आले़. त्यांनी शिळीमकर यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली़. ज्ञानेश्वर वानखेडे याने त्याच्याकडील चाकूने शिळीमकर यांच्या दंडावर, पोटावर व छातीवर वार करुन त्यांचा खुन केला़. 
अनेक वर्षे ओळख असताना इतक्या छोट्या कारणावरुन त्यांनी खुन केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे़. ज्ञानेश्वर वानखेडे याला पकडल्यानंतरच खुनामागील नेमके कारण समजू शकणार आहेत़. 


Web Title: The murder of vegetable seller in Dhankawadi at Pune
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.