नागपुरात भाजयुमोच्या शहर उपाध्यक्षची हत्या,दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:38 PM2020-06-02T21:38:06+5:302020-06-02T23:21:14+5:30

स्वत:च्या पक्षात प्रभाव निर्माण करण्याच्या स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादानंतर दोघांनी चाकू तसेच बॅटचे फटके मारून एकाची हत्या केली. राज विजयराज डोरले ( वय २८) असे मृताचे नाव असून तो भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर उपाध्यक्ष होता.

Murder of BJP city vice-president in Nagpur, two arrested | नागपुरात भाजयुमोच्या शहर उपाध्यक्षची हत्या,दोघांना अटक

नागपुरात भाजयुमोच्या शहर उपाध्यक्षची हत्या,दोघांना अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:च्या पक्षात प्रभाव निर्माण करण्याच्या स्पर्धेतून निर्माण झालेल्या वादानंतर दोघांनी चाकू तसेच बॅटचे फटके मारून एकाची हत्या केली. राज विजयराज डोरले ( वय २८) असे मृताचे नाव असून तो भारतीय जनता युवा मोर्चाचा शहर उपाध्यक्ष होता. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी मुकेश नारनवरे आणि अंकित चतुरकर या दोघांना अटक केली आहे.
कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज डोरले याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून आरोपी मुकेश नीळकंठ नारनवरे आणि अंकित विजयराज चतुरकर या दोघाचा वाद सुरू होता. हे तिघेही एकाच पक्षात कार्यरत होते. आपल्या पक्षात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नरत होते. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. काही दिवसापूर्वी राज याचा मित्र सारंग याच्यासोबत आरोपीचा वाद झाला होता. त्यावेळी राज याने सारंगची बाजू घेऊन आरोपींना फटकारले. त्यामुळे वाद आणखीच वाढला होता. पाच दिवसापूर्वी याच कारणांवरून आरोपींसोबत राजचा कडाक्याचा वाद झाला होता. त्यावेळी अन्य मित्र धावून आल्याने संभाव्य अनर्थ टळला. तेव्हापासून आरोपी मुकेश आणि अंकित राज याचा गेम करण्याच्या तयारीत होते. सोमवारी मध्यरात्री आरोपी मुकेश आणि अंकित या दोघांनी भूतेश्वर नगरात राजला गाठले. आरोपी मुकेशने चाकू काढून राजच्या गळ्यावर वार केले तर अंकितने त्याच्याजवळच्या बॅटने राजच्या डोक्यावर अनेक फटके मारले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. ठाणेदार भोसले यांनी परिसरातील नागरिकांना आरोपींबाबत विचारपूस चालवली असताना तिकडे दोन्ही आरोपी रक्ताने माखलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी दिलेल्या कबुलीजबाबावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली.

तीव्र शोककळा
या घटनेमुळे कोतवाली परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. भाजयुमोचा उपाध्यक्ष असलेला राज पक्षात सक्रिय होताच. मात्र सामाजिक कार्यातही तो पुढे राहायचा. कुणाच्याही अडचणीत तो धावून जायचा. कोरोनाच्या काळात भोजनदान आणि अन्य मदतीसाठीही त्याचा सक्रिय पुढाकार होता. त्यामुळे पक्षातच नव्हे तर परिसरातही त्याचा प्रभाव वाढत होता. तेच आरोपींना खटकत होते. राज याच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मित्रांनी केली दगाबाजी?
राज आणि आरोपीमध्ये सुरू असलेला वाद भयावह वळणावर जाणार असल्याची अनेकांना कल्पना होती आणि अखेर तसेच झाले. विशेष म्हणजे, राजचा गेम करण्याच्या तयारीत असलेले आरोपी नेहमीच टोळक्याने फिरत होते. राज सोबतही नेहमीच कुणी ना कुणी राहायचे . मात्र सोमवारी मध्यरात्री तो एकटाच कसा काय होता, असे कोडे अनेकांना पडले आहे. मित्र म्हणून घेणाऱ्या काहींनी राजसोबत दगाबाजी तर केली नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे.
घटनेच्या वेळी आरोपींसोबत अनेक जण होते. मात्र, या गुन्ह्यात दोघांचाच सहभाग असल्याचे आरोपी सांगत आहे. दुसरीकडे राजची हत्या पाच ते सात जणांनी मिळून केल्याची जोरदार चर्चा कोतवाली परिसरात सुरु आहे. यासंबंधाने पोलिसांकडे विचारणा केली असता आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार या दोघांना आम्ही अटक केली. मात्र पोलीस तपास सुरू असून आणखी प्रत्यक्षदर्शीकडून माहिती मिळाली तसेच यात आणखी कुणाचा सहभाग असल्याचे उघड झाले तर त्यांनाही अटक केली जाईल, असे ठाणेदार भोसले यांनी सांगितले.

प्रोटेक्शन मागणारा तो कोण ?
ही हत्या झाल्यानंतर भूतेश्वर नगरात प्रचंड दहशत निर्माण झाली. अनेकांनी गप्प राहणे पसंत केले. नेमक्या वेळी कोतवाली पोलीस ठाण्यात एकाने संपर्क करून आपल्या जीवाला धोका आहे, आपल्याला लगेच पोलीस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली. ही मागणी त्या व्यक्तीने कोणत्या कारणावरून केली आणि ती व्यक्ती कोण आहे, असा प्रश्न उपस्थित झाला असून त्यासंबंधाने कोतवालीत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: Murder of BJP city vice-president in Nagpur, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.