कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:58 IST2025-12-09T17:55:15+5:302025-12-09T17:58:51+5:30
कला केंद्रातील प्रेमसंबंधांतून धाराशिव हादरलं असून एका तरुणाने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे.

कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
Dharashiv Crime: कला केंद्रातील नर्तिकेसोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधांतून धाराशिव जिल्ह्यात एका तरुणाने स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. पत्नीचा फोन आल्यानंतर प्रेयसीसोबत झालेल्या तीव्र वादातून २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली असून, कला केंद्रातील महिलांसोबत असलेल्या अनैतिक संबंधांचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.
कला केंद्रातील नर्तिकेशी ५ वर्षांपासून संबंध
अश्रुबा अंकुश कांबळे (वय २५, रा. रुई ढोकी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अश्रुबा हा विवाहित होता, मात्र त्याचे धाराशिव येथील चोराखळी येथील 'साई कला केंद्र'मध्ये नृत्य काम करणाऱ्या एका महिलेसोबत गेल्या पाच वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध होते. सोमवारी हे दोघे प्रियकर-प्रेयसी शिखर शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी एकत्र गेले होते. देवदर्शन करून परतत असताना त्यांच्यात मोठा वाद झाला आणि याच वादातून ही दुर्दैवी घटना घडली.
पत्नीच्या फोनमुळे वाद चिघळला
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, देवदर्शनावरून परतत असताना अश्रुबाला त्याच्या पत्नीचा फोन आला. या फोनमुळे नर्तकी प्रेयसी आणि अश्रुबा यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. या वादातून दोघांमध्ये कटुता वाढली. वाद इतका वाढला की, अश्रुबाने आपण आत्महत्या करून घेऊ अशी धमकी प्रेयसीला दिली. मात्र, प्रेयसीने त्याच्या या गंभीर धमकीकडे दुर्लक्ष केले. प्रेयसीने दुर्लक्ष केल्यामुळे निराश झालेल्या अश्रुबाने काही वेळातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांकडून प्रेयसीला अटक
या घटनेची माहिती मिळताच येरमाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी येरमाळा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली असून, महिलेने अश्रुबाला कोणत्या प्रकारे त्रास दिला होता का, याचा तपास करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जामखेडमधील कला केंद्रातील एका नर्तकीने अनैतिक प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. तसेच, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथेही नर्तिकेच्या प्रेमसंबंधातून युवकांनी आपले जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच, धाराशिवमध्ये ही पुनरावृत्ती झाली आहे.