Inquiry into hostel girls nude incedent by police in Jalgaon in two days | दादा! ​​​​​​​ लक्ष ठेवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय! जळगावच्या ‘त्या’ घटनेच्या दोन दिवसांत चौकशीचे आदेश

दादा! ​​​​​​​ लक्ष ठेवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय! जळगावच्या ‘त्या’ घटनेच्या दोन दिवसांत चौकशीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याच्या प्रकरणाची चौकशी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत येत्या दोन दिवसांत करून दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत केली.
विधानसभेतही या घटनेचे पडसाद उमटले. भाजपच्या श्वेता महाले यांनी या घटनेकडे लक्ष वेधले. त्यांनी या घटनेत सामील अधिकारी, पोलिसांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.


त्यावर, गृहमंत्री देशमुख यांनी, ‘सरकारने या घटनेची नोंद घेतली’ असल्याचे सांगताच भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार संतप्त झाले. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात अशी घटना घडते आणि मंत्री फक्त नोंद घेतात हा कुठला न्याय आहे. आताच्या आता कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कांचन पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. कांचन चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक कांचन काळे यांची चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली आहे. ही समिती सर्व साक्षीपुरावे, परिस्थितीची तपासणी करून दोन दिवसांत अहवाल देईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींविरुद्ध कठोर कारवाई हाेईल, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. 

‘लोकमत’चे कोण आहेत? लक्ष ठेवा, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय!
दादा, ‘लोकमत’चे कोण आहेत? हे बघा आम्हाला बोलू दिलं जात नाही. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय, असे तक्रारदार मुलगी खिडकीतून ओरडून सांगत होती. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बोला, असे म्हणताच या मुलीला शासकीय वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांनी हात धरून खोलीत ओढले. ती खाली पत्रकारांशी बोलायला आली तेव्हाही तिला बोलण्यापासून रोखले.

 

Web Title: Inquiry into hostel girls nude incedent by police in Jalgaon in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.