महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; Whatsapp स्टेटसमुळे घटना उघडकीस, हत्येचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 12:06 IST2025-12-02T12:05:43+5:302025-12-02T12:06:35+5:30
हेमलता ज्या खोलीत भाड्याने राहत होती, तिथे लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा खोलीतला दरवाजा आतून बंद होता

महिला पोलीस कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू; Whatsapp स्टेटसमुळे घटना उघडकीस, हत्येचा दावा
उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यात एका २८ वर्षीय महिला कॉन्स्टेबलचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. या पोलीस महिलेने गळफास घेतल्याचे सांगितले जाते परंतु तिच्या कुटुंबाने मुलीच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मुलीची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
माहितीनुसार, मृत पोलीस महिलेचे नाव हेमलता असे आहे. हेमलता बन्नादेवी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती. शनिवारी तिचा मृतदेह खोलीत आढळला. या घटनेनंतर पोलीस आणि तिच्या कुटुंबियांनी वेगवेगळे दावे केले आहे. हेमलताचे वडील करमवीर सिंह आग्राच्या बैमन गावात शेती करतात. मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर वडिलांनी मोठा दावा केला आहे. माझी मुलगी टोकाचे पाऊल उचलू शकत नाही, हेमलताचा आधी गळा दाबला आणि त्यानंतर तिला फासावर लटकवले जेणेकरून तिने गळफास घेतल्याचं वाटेल. ती मानसिकरित्या मजबूत होती असं तिच्या वडिलांनी दावा केला. तर अद्याप याबाबत कुठलीही लेखी तक्रार मिळाली नाही असं पोलिसांनी म्हटलं.
हेमलता ज्या खोलीत भाड्याने राहत होती, तिथे लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा खोलीतला दरवाजा आतून बंद होता. प्राथमिकदृष्ट्या तिने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला परंतु तिच्या कुटुंबाने केलेल्या दाव्यानंतर प्रकरण गंभीर बनले आहे. हेमलताच्या मृत्यूची कल्पना पोलिसांना तिच्या मित्राने दिली. त्या मित्राने हेमलताचा व्हॉट्सअप स्टेटस पाहिला, ज्यात तिने आत्महत्या करणार असल्याचं लिहिले होते. हा स्टेटस पाहून त्याने तात्काळ पोलिसांना अलर्ट केले. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि दरवाजा तोडून आत घुसले. त्यावेळी हेमलताचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. मात्र वडिलांनी मुलीच्या व्हॉट्सअप स्टेटसवरही संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, पोलीस जेव्हा पोहचले तेव्हा घरातील दरवाजा आतून बंद होता, व्हॉट्सअपवर तिने लिहिलेल्या पोस्टमुळे हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं दिसून येते. पोलीस त्याच आधारे पुढील तपास करत आहेत. मात्र मृत मुलीच्या वडिलांनी ती मानसिकरित्या मजबूत होती, कुठल्याही परिस्थितीत ती हे पाऊल उचलू शकत नाही असा दावा केला आहे. याबाबत लिखित तक्रार मिळाल्यानंतर योग्य तो तपास करून निष्कर्ष काढला जाईल अशी माहिती डिआयजी प्रभाकर चौधरी यांनी दिली.