"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 08:45 IST2025-12-09T08:44:52+5:302025-12-09T08:45:14+5:30
निक्कू आणि पल्लवीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोघांच्या जाती वेगळ्या असल्याने निक्कूच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध केला होता.

AI Generated Image
चार वर्षांचे प्रेमसंबंध असतानाही तरुणीने दुसरीकडे लग्न करण्यास होकार दिल्यानंतर चिडलेल्या बॉयफ्रेंडने थेट तिच्या होणाऱ्या सासरच्या लोकांना आपल्या नात्याबद्दल सांगितले. यानंतर तरुणीचे लग्न मोडले, मात्र त्यातून निर्माण झालेला मानसिक दबाव सहन न झाल्याने तरुणीने विहिरीत उडी मारून आपले आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या बालाघाट परिसरात घडली. या तरुणीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून त्यात आपल्या मृत्यूसाठी बॉयफ्रेंड निक्कू गौतम जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या तरुणीचे नाव पल्लवी असून, ती अवघ्या २५ वर्षांची होती.
पल्लवीने आपल्या शेवटच्या चिठ्ठीत निक्कूचे सगळे कारनामे लिहीत, त्यालाच कंटाळून आपण आपले आयुष्य संपवत असल्याचे म्हटले आहे. तिने या चिठ्ठीत लिहिले की, 'मला माझ्या कुटुंबाच्या इच्छेने लग्न करायचे होते. मी खरंच निर्दोष आहे. मात्र, यापुढे आणखी अपमान सहन करण्याची ताकद माझ्यात नाही. माझे लग्न मोडल्यामुळे आणि समाजात माझ्या कुटुंबाचा अपमान झाल्यामुळे मला खूप दुःख होत आहे. हेच दुःख मी आता आणखी सहन करू शकत नाही. या सगळ्याला निक्कू जबाबदार आहे.'
नेमकं काय झालं?
पल्लवीच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे कुटुंब तिचे लग्न ठरवत होते. १ डिसेंबर रोजी रायपूरमधून तिच्यासाठी एक स्थळ देखील आले होते. रायपूरच्या मुलासोबत पल्लवीचे लग्न ठरले होते. मात्र, मुलाकडचे कुटुंब परतीच्या प्रवासाला निघाले असता, निक्कू याने त्यांना रस्त्यात गाठलं आणि रडून ओरडून पल्लवीसोबतचे त्याचे नाते काय आहे, हे सांगितले. पल्लवी माझी आहे, मी हे लग्न होऊ देणार नाही, असे निक्कूने म्हणताच मुलाकडच्या लोकांनी ठरलेले लग्न मोडले. यानंतर निक्कू पल्लवीला फोन करून सतत धमकावत होता. 'तुझे लग्न माझ्याशी झाले नाही, तर मी इतर कुणाशीही होऊ देणार नाही', असे तो सतत बोलत होता. यामुळे पल्लवी मानसिकरित्या तणावात होती. ५ डिसेंबर रोजी तिने एक चिठ्ठी लिहून, विहिरीत उडी मारली.
६ डिसेंबर रोजी पल्लवी घरात दिसली नसल्याने कुटुंबातील लोकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. पोलिसांनी पल्लवीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
निक्कू आणि पल्लवीच्या प्रेमात जातीचा अडथळा
निक्कू आणि पल्लवीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, दोघांच्या जाती वेगळ्या असल्याने निक्कूच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध केला होता. यामुळेच दोघांचे लग्न होऊ शकले नाही, अखेर पल्लवीने आपल्या कुटुंबाच्या संमतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिने निक्कूशी सगळे संबंध तोडले होते. मात्र, निक्कू पुन्हा तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता.
तिरोडी पोलीस स्टेशनचे प्रभारी कौशल कुमार सूर्या यांच्या मते, पल्लवीने तिच्या सुसाईड नोटमध्ये निक्कू गौतमवर स्पष्टपणे आरोप केले आहेत. या आधारे, आरोपीला फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम १०८ अंतर्गत अटक करण्यात आली आणि ८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.