पत्नी कुठं जाते?, कुणाला भेटते? जाणून घेण्यासाठी पतीनं कारमध्ये लावलं GPS सिस्टम अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:06 PM2021-09-29T13:06:50+5:302021-09-29T13:07:47+5:30

आपली पत्नी कुठं जाते? कुणाला भेटते? हे जाणून घेण्यासाठी पतीनं तिच्या कारमध्ये ट्रॅकिंग सिस्टम (GPS) लावल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

Husband Tracks Estranged Wife And Doctor With Gps In Gurugram | पत्नी कुठं जाते?, कुणाला भेटते? जाणून घेण्यासाठी पतीनं कारमध्ये लावलं GPS सिस्टम अन् मग...

पत्नी कुठं जाते?, कुणाला भेटते? जाणून घेण्यासाठी पतीनं कारमध्ये लावलं GPS सिस्टम अन् मग...

Next

आपली पत्नी कुठं जाते? कुणाला भेटते? हे जाणून घेण्यासाठी पतीनं तिच्या कारमध्ये ट्रॅकिंग सिस्टम (GPS) लावल्याचं प्रकरण समोर आलं आहे. गुरुग्राममधील एका पतीचा आपल्या डॉक्टर पत्नीसोबत वाद सुरू होता. डॉक्टर पत्नीवर पाळत ठेवण्याच्या उद्देशानं पतीनं तिच्या नकळत कारमध्ये जीपीएस सिस्टम लावलं होतं. २६ सप्टेंबर रोजी पत्नीचा मोबाइल चुकून कारमध्ये पडला तर तो शोधत असताना तिला जीपीएस सिस्टम कारमध्ये फिट करण्यात आल्याचं दिसून आलं आणि तिचा तिळपापड झाला. पत्नीनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

"मी माझ्या कारमध्ये एका पेशंटची वाट पाहात होते आणि माझा फोन गिअर बॉक्सजवळ ठेवत होते. त्यावेळी चुकून माझा फोन खाली पडला. फोन उचलत असताना खाली काळ्या रंगाचा एक छोटा बॉक्स दिसून आला. अशा पद्धतीचा बॉक्स याआधी कधीच मी माझ्या कारमध्ये पाहिला नव्हता. त्यामुळे मला धक्काच बसला. तो जेव्हा मी खेचून बाहेर काढला आणि उघडून पाहिलं तर त्यात एक पोर्टेबल ट्रॅकर ठेवण्यात आला होतं", असं डॉक्टर पत्नीनं पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. 

संबंधित डिव्हाइसचा फोटो काढून भावाला पाठवला होता आणि त्याच्या मदतीनं याची माहिती घेतली होती. त्यानंतरच डिव्हाइलसला हात लावला आणि तो खेचून काढला, असंही तिनं आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे. डिव्हाइसच्या आत एक सीमकार्ड मिळालं असून यामाध्यमातून माझं लोकेशन ट्रेस केलं जात होतं असा आरोप तिनं केला आहे. 

आपल्या पतीसोबत गेल्या काही महिन्यांपासून वाद होत असून त्यानंच आपल्या क्लीनरच्या मदतीनं हे कृत्य केल्याचंही डॉक्टर पत्नीनं तक्रारीत म्हटलं आहे. महिलेनं केलेली तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली आहे. पोलिसांनी भारतीय दंडविधान ३५४ डी (पाळत ठेवणे), ३५४ सी आणि ५०६ (धमकी देणे) आणि आयटी अॅक्टच्या ६७ कलमाअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. 

तक्रारदाराकडून आम्ही सर्व माहिती घेतली असून कारमध्ये कुणी डिव्हाइस लावलं होतं याचा तपास सुरू आहे. यामागे नेमका काय उद्देश होता हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत या प्रकरणात कोणतीही अटक करण्यात आलेली नाही, असं सेक्टर ५६ पोलीस ठाण्याचे अधिक्षक अमित कुमार म्हणाले. 

Read in English

Web Title: Husband Tracks Estranged Wife And Doctor With Gps In Gurugram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.