पती की राक्षस? हुंड्यासाठी पत्नीचा छळ; नवऱ्याने इंजेक्शनं टोचली, तर नणंदबाईने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:27 IST2025-12-02T15:25:18+5:302025-12-02T15:27:23+5:30
एका विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि गंभीर अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील गोरखुपरमध्ये एका विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि गंभीर अत्याचार केल्याचा आरोप लावला आहे. पतीने नस सुकवण्याचं इंजेक्शन दिल्याचा आणि नणंदेने बळजबरीने गर्भपाताचे औषध पाजल्याचा धक्कादायक आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
कॅम्पियरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण असून, एका नवविवाहित महिलेने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकवली आहे. विवाहितेचा आरोप आहे की, हुंड्यात कमी सामान मिळाल्याने सासरचे लोक तिला सतत त्रास देत होते. शारीरिक आणि मानसिक छळामुळे ती त्रस्त होती, पण सासरच्या लोकांनी क्रूरतेची सीमा ओलांडली.
नस सुकवण्याचं इंजेक्शन आणि गर्भपात
शशी यादव नावाच्या या नवविवाहितेने आरोप केला आहे की, हुंड्यात कमी वस्तू मिळाल्यामुळे सासरचे लोक रोज तिच्यासोबत मारहाण करत असत. यात तिचा पती जितेंद्र यादव हादेखील सामील होता. पतीने तिला कोणतीही वैद्यकीय गरज नसताना नस सुकवण्याचं इंजेक्शन टोचले. तर, नणंदेने तिला जबरदस्तीने गर्भपात करणारे औषध खायला लावले. यामुळे तिची तब्येत बिघडली आणि तिचा गर्भपात झाला.
शशी यादवने सांगितले की, १ मे २०२५ रोजी जितेंद्र यादव याच्यासोबत हिंदू रितीरिवाजानुसार तिचं लग्न झालं होतं. तिच्या घरच्यांनी ५ लाख रुपये रोख, एक पल्सर मोटारसायकल, सोने-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू देऊन तिला सासरी पाठवले होते.
माहेरी पाठवलं, पण दागिने ठेवून घेतले!
पीडितेने पुढे सांगितले की, २८ जुलै २०२५ रोजी बंदोह बनोहिया येथील तिच्या सासरच्या घरी तिला खूप मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने ती माहेरी जाण्यासाठी निघाली. २९ जुलैला तिला माहेरी पाठवण्यात आले, पण सासरच्या लोकांनी तिचे सगळे दागिने आणि इतर सामान स्वतःकडे ठेवून घेतले आणि तिला रिकाम्या हाताने पाठवले.
डॉक्टरी तपासणीत धक्कादायक खुलासा
शशी यादव हिने पतीच्या या क्रूर कृत्याचा विरोध केला, तेव्हा सासरचे लोक तिच्यावर चारचाकी वाहन घेऊन येण्यासाठी दबाव टाकू लागले. पीडितेने सांगितले, "माझी तब्येत सतत खराब राहू लागल्यामुळे मी पीपीगंज येथील डॉ. रीमा गोयल यांच्याकडून तपासणी करून घेतली. तेव्हा मला कळलं की, माझा पती विनाकारण मला नस सुकवणारे इंजेक्शन देत होता."
पोलिसांकडून तपास सुरू
पीडितेने या अत्याचारांची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. महिला पोलीस स्टेशन प्रभारींनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, कसून तपास सुरू आहे. कॉल डिटेल्स, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.