तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:20 IST2025-12-02T13:19:40+5:302025-12-02T13:20:16+5:30
ही घटस्फोटाची केस एका पतीने दाखल होती. त्याने आपल्या पत्नीवर पांढरे डाग लपवल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
मध्य प्रदेशची राजधानी इंदूरमध्ये फॅमिली कोर्टाने एक घटस्फोटाची याचिका फेटाळत एक महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. ही घटस्फोटाची केस एका पतीने दाखल होती. त्याने आपल्या पत्नीवर पांढरे डाग लपवल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान असे आढळून आले की, पतीचे आरोप खोटे असून, तो स्वतःच्या चुका लपवण्याचा प्रयत्न देखील करत होता. पती कोर्टात पत्नीवर आरोप करत असताना, पत्नीने कोर्टात एक अशी मागणी केली ज्याने या प्रकरणाची दिशाच बदलून टाकली. इतकंच नाही तर, कोर्टाने पतीला फटकारत घटस्फोट रद्द केला आहे.
पत्नीने सादर केलेल्या पुराव्यांवरून स्पष्टपणे सिद्ध झाले की, पतीच या सगळ्यासाठी जबाबदार होता. पतीनेच पत्नीला त्रास दिला, तिला सोडून इतर महिलांशी संबंध प्रस्थापित केले. हे प्रकरण इंदूरमधील एका प्रतिष्ठित मोबाईल सर्व्हिस सेंटर व्यावसायिकाशी आणि त्याच्या डॉक्टर पत्नीशी संबंधित आहे. दोघांनी जानेवारी २०११ मध्ये आर्य समाज, भगीरथपुरा येथे प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ दोघेही आनंदाने नांदत होते. परंतु, काही दिवसांतच पत्नीला तिच्या सासरच्या लोकांकडून छळ सहन करावा लागला. पत्नीचे वकील कृष्ण कुमार कुन्हारे आणि डॉ. रूपाली राठोड यांनी न्यायालयाला सांगितले की, कुटुंबातील सदस्यांनी सुनेला तिच्या त्वचेच्या आजारावरून अपमानित केले, तिला बाथरूम स्वच्छ करायला लावले आणि दहा लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी देखील केली.
पत्नीने न्यायालयात 'असे' पुरावे सादर केले की..
कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून पत्नी तिच्या पतीसोबत वेगळ्या भाड्याच्या घरात राहू लागली. तरीही, पतीचे वागणे मात्र बदलले नाही. वकिलांच्या म्हणण्यानुसार, २०१७ मध्ये पतीने व्यवसायाच्या बहाण्याने इंदूरमध्ये इतरत्र राहण्याची व्यवस्था केली. या दरम्यान त्याने पत्नी आणि मुलाला एकटे सोडले. या काळात, त्याचे इतर महिलांशी संबंध निर्माण झाले, ज्याचे फोटो पत्नीने न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले.
सुनावणीदरम्यान, जेव्हा पत्नीने पतीला त्याच्या हातावर असलेला दुसऱ्या महिलेच्या नावाचा टॅटू दाखवण्यास सांगितले, तेव्हा त्याने नकार दिला आणि ती माझी वैयक्तिक बाब असल्याचे म्हटले. मात्र, कोर्टाच्या आदेशामुळे त्याला टॅटू दाखवावा लागला. लग्नापूर्वी पत्नीने तिचा त्वचारोग लपवला होता, हा पतीचा आरोप आर्य समाजाच्या लग्नातील छायाचित्रांद्वारे खोटा ठरला. छायाचित्रांमध्ये त्याच्या पत्नीच्या हातावर त्वचारोग स्पष्टपणे दिसत होता, ज्यामुळे हे सिद्ध झाले की, तिने ही स्थिती कधीही लपवली गेली नव्हती.
पत्नीचीच झाली फसवणूक
पत्नीने असाही युक्तिवाद केला की, जेव्हा तिने घटस्फोट देण्यास नकार दिला, तेव्हा तिच्या पतीने २०२० मध्ये खोट्या कारणांवरून घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. दरम्यान, महिला पोलीस ठाण्यात तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ते सध्या जामिनावर आहेत. सर्व पुरावे आणि युक्तिवाद तपासल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, पत्नीने पतीविरुद्ध कोणतेही क्रूर कृत्य केलेले नाही, उलट पतीने तिला सोडून दिले आणि तिच्यावर अत्याचार करत राहिला. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, पती घटस्फोट मागण्यासाठी स्वतःच्या चुकांचा फायदा घेऊ शकत नाही. म्हणून, कुटुंब न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका पूर्णपणे फेटाळून लावली आणि पत्नीला न्याय दिला.