With the help of a friend, a wife attacks her husband by pouring oil on him | खळबळजनक! मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर उकळतं तेल ओतून जीवघेणा हल्ला
खळबळजनक! मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर उकळतं तेल ओतून जीवघेणा हल्ला

ठळक मुद्दे भविष्य भु-हागोहा असं जखमी पतीचं नाव असून क्विन्सीया भु-हागोहाय असं पत्नीचं नाव आहे.वसई पश्चिमेकडील उमेळमान परिसरातील प्रतापगड या इमारतीत ही घटना घडली आहे.

वसई - मित्राच्या मदतीने पत्नीने पतीवर उकळतं तेल ओतून जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना वसई पश्चिम परिसरात घडली आहे. पतीचे पाय बांधले आणि अंगावर उकळतं तेल टाकत, डोळ्यात मिरची पूड, डोक्यावर हातोडीने वार करून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. माणिकपूर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या मित्राला ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच पुढे कांबळे म्हणाले की, जखमी पतीला मुंईच्या जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे. भविष्य भु-हागोहा असं जखमी पतीचं नाव असून क्विन्सीया भु-हागोहाय असं पत्नीचं नाव आहे.

वसई पश्चिमेकडील उमेळमान परिसरातील प्रतापगड या इमारतीत ही घटना घडली आहे. कौटुंबिक भांडणातून क्विन्सीयाने आपल्या पतीला मारहाण करताना उकळतं तेल त्याच्या अंगावर आणि डोळ्यात फेकलं. तसेच हातोडीने डोक्यावर वार केले. घरात मिळेल त्या सामानाने त्याला मारहाण केली. त्याचे पाय रस्सीने बांधून त्याला टॉयलेटमध्ये ठेवलं होतं.
जखमी भविष्यनं जीव वाचवण्यासाठी प्रेशर कुकर आणि स्पीकर हे किचनच्या खिडकीतून बाहेर फेकल्यावर आजूबाजूचे रहिवाशी त्याच्या रुममध्ये पोहचले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले.  ही सर्व मारहाण होत असताना त्यांची दोन लहान जुळी मुलं देखील घरी होती. या प्रकरणी पत्नी क्विन्सीया भु-हागोहाय आणि तिचा मित्र सतवीर नायक याला पोलिसांनी अटक केली आहे. कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून पतीच्या म्हणण्यानुसार नायक हा पत्नीचा मित्र आहे तर पत्नीच्या म्हणण्यानुसार नायक हा पतीचा मित्र आहे. 

क्विन्सीया ही ख्रिश्चन तर भविष्य हा मूळ आसामचा रहिवाशी आहे. या दोघांनीही आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. भविष्य हा मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. ते वसईच्या उमेळमान परिसरातील प्रतापगड या सोसायटीमध्ये भाड्यानं राहतात. त्यांना दोन लहान जुळी मुलं आहेत. भविष्यला पोलिसांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक होती असून सध्या स्थिर असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. 

Web Title: With the help of a friend, a wife attacks her husband by pouring oil on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.