सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:07 IST2025-11-12T16:06:02+5:302025-11-12T16:07:09+5:30
पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासोबत हनिमूनसाठी मेघालयला गेलेला राजा आधी गायब झाला आणि नंतर कधीच घरी परतला नाही.

सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
मध्य प्रदेशातील इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने अवघा देश सुन्न झाला होता. पत्नी सोनम रघुवंशी हिच्यासोबत हनिमूनसाठी मेघालयला गेलेला राजा आधी गायब झाला आणि नंतर कधीच घरी परतला नाही. त्याच्या हत्येमागची जी कहाणी समोर आली, ती ऐकून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. एकीकडे नव्या आयुष्याची स्वप्नं रंगवून फिरायला गेलेल्या राजाची हत्या ही त्याच्याच पत्नीने अर्थात सोनम रघुवंशी हिने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने घडवून आणली होती. या प्रकरणाची सुनावणी आता कोर्टात सुरू झाली आहे. या प्रकरणात मृत राजा रघुवंशी याचा भाऊ विपिन रघुवंशी याने आपला पहिला जबाब नोंदवला आहे.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच, विपिन यांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली. ही सुनावणी दोन तास चालली. मात्र, वेळ अपुरा पडल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही. आता २६ नोव्हेंबर रोजी विपिन यांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. या सुनावणीदरम्यान, विपिन यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया दुपारी ३.२०ला सुरू झाली आणि ५.३० वाजता थांबवण्यात आली.
साखरपुडा, लग्न, हनिमून आणि हत्या...
विपिन यांनी आपल्या जबाबात अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी विपिन यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. राजा रघुवंशी गायब होण्यापासून, ते एफआयआर नोंदवणी, राजा आणि सोनम यांचा साखरपुडा व लग्न या संदर्भात देखील अनेक प्रश्न विचारण्यात आले. राज्य मेघालयला कधी गेला, त्याचा फोन बंद कधी झाला, असे काही प्राथमिक प्रश्न सुरुवातीला विचारले गेले. मात्र, वेळेअभावी काही उत्तरे अपूर्ण राहिल्याचे विपिन रघुवंशी यांनी म्हटले.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ नोव्हेंबर रोजी होणार असून, राजा रघुवंशीचा भाऊ विपिन यांना पुन्हा एकदा शिलाँगला यावे लागणार आहे. त्यांना या प्रकरणातील आरोपपत्राची प्रत अद्याप मिळालेली नाही. साक्षीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्राची प्रत त्यांना देण्यात येईल. त्यानंतरच त्यांना या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे पैलू समजू शकतील. या प्रकरणात राजाचा भाऊ विपिन याची साक्ष महत्त्वाची मानली जात आहे, जी खटल्याची दिशा ठरवू शकते.