'दोस्त दोस्त ना रहा'; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:59 AM2019-12-10T11:59:19+5:302019-12-10T12:04:57+5:30

काकांडी शिवारात पोत्यात आढळून आला मृतदेह

'Friends are not friends'; Murder of a friend over suspicion of affair with his wife | 'दोस्त दोस्त ना रहा'; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राची हत्या

'दोस्त दोस्त ना रहा'; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राची हत्या

Next
ठळक मुद्देशनिवारपासून तरुण होता गायब पोलिसांनी ४८ तासात केला उलगडा

नांदेड : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची हत्या केल्याची घटना सोमवारी (९ ) रात्री उघडकीस आली. तुषार श्रीरंग पवार असे मृताचे नाव असून त्याचा मृतदेह काकांडी शिवारात एका पोत्यात आढळून आला. या प्रकरणी भाग्यनगर पोलीसांनी तुषाराचा मित्र व नातेवाईक असलेल्या मारेकऱ्यास ४८ तासाच्या आत जेरबंद केले आहे.

नांदेडच्या श्रीनगर भागात शिक्षणानिमित्त राहत असलेला तुषार श्रीरंग पवार (१९, रा इस्लापूर ) हा युवक ७ डिसेंबरला रात्री घरी आला नाही. यामुळे त्याच्या पालकांनी ८ डिसेंबर रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. यानंतर भाग्यनगर पोलीस स्थानकाचे  पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तपासाची चक्रे फिरवली. तुषारचा मोबाईल बंद झाल्याचे ठिकाण आणि शेवटचा कॉल याबाबत पोलिसांनी माहिती घेणे सुरु केले. दरम्यान, दिलीप बळीराम मेटकर (२१) यास पोलिसांनी तपासासाठी बोलावले. परंतु त्याने येणास टाळाटाळ केली. 

यामुळे पोलिसांनी अधिक तपास केला असता ज्याभागात तुषारचा मोबाईल बंद झाला होता तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेथील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिलीपच्या दुचाकीवर तुषार दिसून आला. याच दरम्यान तुषार पवारचा मृतदेह काकांडी शिवारात एका शेतकऱ्यास आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. इकडे भाग्यनगर पोलीसांनी दिलीपला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तुषारचा गळा दाबून खून केला असल्याची कबुली दिली. तसेच त्याचा मृतदेह काकांडी शिवारात टाकल्याचे सांगितले. 

आरोपीचा मित्र आणि नातेवाईक
दिलीपचे लग्न झालेले असून तुषार हा त्याचा मित्र व नातेवाईक होता. मात्र, तुषारचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय दिलीपला होता. यातूनच हि हत्या झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत पोलीस तपास सुरु असून या गुन्ह्यात एकापेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असलायची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच सर्व आरोपींना लवकरच जेरबंद करु असा विश्वास पोलीस निरीक्षक काकडे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: 'Friends are not friends'; Murder of a friend over suspicion of affair with his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.