आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:58 IST2025-12-09T13:57:25+5:302025-12-09T13:58:37+5:30
आई मदतीने मुलीने आधी स्वतःच्याच १४ वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर दोघींनी आत्महत्या करत आयुष्य संपवले.

आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर
एका १४ वर्षाच्या मुलाची त्याच्या आईने आणि आजीने हत्या केली. घरातच त्याची हत्या केल्यानंतर मायलेकींनीही आत्महत्या केली. बंगळुरुतील सुड्डागुंटेपल्यामध्ये ही घटना घडली. मदम्मा (वय ६८), मुलगी सुधा (वय ३८) आणि सुधा यांचा मुलगा मौनीश (वय १४) अशी मृतांची नावे आहेत.
मुलाला मारले, आई आणि मुलीने घेतले विष
८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आई आणि मुलीने आधी १४ वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर दोघींनी विषारी पदार्थ खाल्ला. सुड्डागुंटेपल्या पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली.
मुलाची हत्या करून आत्महत्या का केली?
तिघांचे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली. आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली गेली होती का, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासातून या घटनेचे कारण समोर आले.
आर्थिक तंगीमुळे दोघींनी मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मायलेकी आधी बिर्याणीचा व्यवसाय करायच्या. त्यानंतर त्यांनी चिप्स बनवणे सुरू केले. पण, दोन्हीही व्यवसायात तोटा झाला. त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा भार वाढतच गेला.
गेल्या काही महिन्यांपासून मदम्मा आणि सुधा घरखर्च भागवण्यासाठी दुसऱ्यांच्या घरातील कामे करायच्या. दूध वाटण्याच्या कामालाही त्या जात होत्या. सुधा मागील अनेक वर्षांपासून पतीपासून वेगळी राहायची. ती मुलगा आणि आईसोबत राहत होती.