गस्तीवरील पोलिसांवर मोटारसायकलस्वारांनी झाडल्या ठासणीच्या बंदुकीतून दोन फैरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 04:24 PM2021-05-11T16:24:11+5:302021-05-11T16:24:33+5:30

Firing : पाल रस्त्यावरील पहाटेची घटना ; थांबविले  होते चौकशीसाठी 

Firing on police who were on petroling by two wheeler driver | गस्तीवरील पोलिसांवर मोटारसायकलस्वारांनी झाडल्या ठासणीच्या बंदुकीतून दोन फैरी

गस्तीवरील पोलिसांवर मोटारसायकलस्वारांनी झाडल्या ठासणीच्या बंदुकीतून दोन फैरी

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही मोटारसायकलवरील दोघंही बंदुकधारी युवकांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेले पोलीसांचे वाहन व पोलीसांना रस्त्यात उभे असल्याचे पाहून पोलीसांना जीवे  मारण्याच्या उद्देशाने त्या  युवकांनी ठासणीच्या बंदकीतून पोलीसांच्या दिशेने दोन फैरी झाडल्याने एकच खळबळ उडाल

रावेर  (जि. जळगाव) : रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी रस्त्याने पालकडून येत असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील  दोन जणांनी  ठासणीच्या बंदुकीतून गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडून पोबारा केला.  पाल - रावेर रस्त्यावर सहस्त्रलिंग गावालगतच्या सलीमच्या ढाब्याजवळ मंगळवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
 

याबाबत रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, सातपुड्याच्या  अतिदुर्गम डोंगरदऱ्यातून जाणार्‍या रावेर - पाल रस्त्यावर रावेर पोलीस  स्टेशनच्या कॅमेरा वाहनातून पोकॉ श्रीराम कंगणे, गृहरक्षक तालूका  समादेशक कांतीलाल तायडे, सुनील तडवी, अमित समर्थ हे गस्त घालत शेरीनाका मध्यप्रदेश सीमेवरील आंतरराज्यीय  नाकाबंदीला भेट देत रावेरकडे परतीच्या मार्गाने प्रयाण केले.      दरम्यान, सहस्त्रलिंग गावालगतच्या वळणरस्त्यावरील सलीमचा  ढाबा येथे चहापाणी मिळते काय? यासाठी वाहनाच्या  खाली उतरून पोकॉ कांगणे व त्यांचे सहकारी चौकशी करीत 
असतानाच पालकडून दोन मोटारसायकलवर चार जण येत असल्याचे त्यांना दिसले. तथापि, रात्रीच्या संचारबंदीत संशयास्पद स्थितीत कोण फिरत आहेत? यासंबंधी चौकशी करण्यासाठी त्यांनी मोटारसायकलस्वारांना हात देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोन्ही मोटारसायकलवरील दोघंही बंदुकधारी युवकांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेले पोलीसांचे वाहन व पोलीसांना रस्त्यात उभे असल्याचे पाहून पोलीसांना जीवे  मारण्याच्या उद्देशाने त्या 
युवकांनी ठासणीच्या बंदकीतून पोलीसांच्या दिशेने दोन फैरी झाडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सुदैवाने कोणासही हानी नाही

संशयित आरोपींनी केलेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. हे विशेष. सदरची घटना  १० मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींनी युटर्न  घेवून पालकडे तर दुसर्‍या मोटारसायकलवरील आरोपींनी सहस्त्रलिंगकडे पोबारा केल्याने पाठलाग करणार्‍या पोलीसांच्या हाती अपयश आले. अंदाजे विशी ते पंचविशतील हे तरूण असण्याचा पोलीसांनी अंदाज वर्तवला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
या घटनेबाबत पाल औटपोस्ट चौकीतून संदेश प्राप्त होताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर  पोलीस 
उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, प्रभारी पोलीस निरीक्षक बशीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी घटनास्थळी  भेट दिली. यानंतर तपासचक्र गतीमान केले आहे.
 
शिकारीसाठी ‘ते’ जात असावे

संशयीत आरोपी ठासणीच्या बंदुका घेऊन शिकारीसाठी जात  असताना त्यांना पोलीस वाहन व रस्त्यावर खाकी वस्त्र परिधान  केलेले चार जवान उभे दिसल्याने कदाचित वन्यजीव वा वनविभागाचे  कर्मचारी असल्याचे संशयातून त्यांनी थेट जीवे ठार मारण्याचे उद्देशाने  दोन बंदकीतून दोन फैरी झाडल्याचा अंदाज असल्याचा संशय व्यक्त 
केला जात आहे. याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात भादंवि कलम ३०७, ३५३, ३३७, आर्म अॅक्ट ३(२५) व ३४ अन्वये बंदुकीच्या दोन फैरी झाडून पोलिसांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास  अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस 
निरीक्षक शितलकुमार नाईक हे पुढील तपास करीत आहेत.


बंदूक धावपळीत सोडून गेले
 
गस्तीवरील पोलिसांवर ठासणीच्या बंदुकीतून फैरी झाडणारे आरोपी  पसार झाले असले तरी पसार होण्याच्या धावपळीत त्यांच्या  हातातील ठासणीची बंदूक मात्र ते सोडून गेल्याने पोलीसांना  तपासाचा धागादोरा त्यातून गवसतो का? हा पुढे कळेलच.

Web Title: Firing on police who were on petroling by two wheeler driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.