बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या; पोलीस अन् व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमूद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 09:23 PM2020-12-22T21:23:52+5:302020-12-22T21:25:08+5:30

Farmer Suicide : अंजनगाव सुर्जीच्या सहायक पोलीस निरीक्षक, व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा

Farmer commits suicide by writing suicide note in the name of Bachchu Kadu | बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या; पोलीस अन् व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमूद

बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या; पोलीस अन् व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमूद

Next
ठळक मुद्देशालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास तालुक्यात उघड झाली.

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व त्यापाठोपाठ पोलिसांनी केलेल्या मारहाणीची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास तालुक्यात उघड झाली.

अशोक पांडुरंग भुयार (५५, रा. धनेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक श्रावण जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर (दोघेही रा.अंजनगाव सुर्जी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील बोराळा येथे गणपती मंदिराच्या परिसरातील शेतात एक व्यक्ती मृतावस्थेत पडून असल्याची माहिती मंगळवारी दुपारी अंजनगाव पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधिताने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात आले. मृतदेहाची झडती घेतली असता, त्यांच्या कपड्यात एका पानाची चिठ्ठी आढळली. त्यावरून मृत व्यक्तीची अशोक भुयार अशी ओळख पटली. यानंतर त्यांना संत्रा व्यापारी व अंजनगाव पोलिसांकडून मारहाण करण्यात आली, पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून न घेता परत पाठविले, ही माहिती उघड झाली. त्यांनी ही संपूर्ण माहिती ना. बच्चू कडू यांच्या नावे न्याय मिळण्याच्या हेतूने लिहून ठेवली. भुयार यांनी आपल्यावरील अन्यायाची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून ठेवल्याने थंडीतही राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.


चिठ्ठीत काय?
शेतकरी अशोक भुयार यांनी त्यांच्या धनेगाव येथील शेतातील संत्री अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकण्याचा व्यवहार केला. मात्र, त्या दोन व्यापाऱ्यांनी भुयार यांना शेतामध्ये दारू पाजून संत्राविक्रीचे पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेतली. मारहाणदेखील केली. त्याबाबतची तक्रार देण्यास ते धनेगाव येथील पोलीस पाटलासह अंजनगाव पोलीस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी गेले असता, त्याठिकाणी बीट जमादार व ठाणेदाराने बेदम मारहाण केली, असे लिहून त्याखाली अशोक भुयार यांनी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी केली आहे.


पोलीस ठाण्यात जमाव
शेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ठाणेदार व बीट जमादाराविरुद्ध गून्हा दाखल करण्याची मागणी संतप्त जमावाने केली. मंगळवारी दुपारपासूनच ठाण्यातील वातावरण कमालीचे चिघळले होते. अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी तातडीने अंजनगाव पोलीस ठाणे गाठले. ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक पोलीस अधिकारी शेतकरी भुयार यांना मारहाण करीत असल्याचे दिसून आले. यामुळे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. त्यानंतर मृताचा मुलगा गौरव अशोक भुयार याच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला आहे. मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक व दोन संत्रा व्यापाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.
- श्याम घुगे, अपर पोलीस अधीक्षक

Web Title: Farmer commits suicide by writing suicide note in the name of Bachchu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.