सैन्यात 'जॉईन' होण्यासाठी उत्साहात तरुण आसामला गेले; मात्र सत्य कळल्यानंतर सर्वाना धक्काच बसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 04:31 PM2020-08-03T16:31:27+5:302020-08-03T16:45:25+5:30

सैन्यात भरतीच्या नावावर तरुणांकडून ३६ लाख रुपये उकळले

Excited young men went to Assam after the order of selection in the army; But when they went there, everyone was shocked | सैन्यात 'जॉईन' होण्यासाठी उत्साहात तरुण आसामला गेले; मात्र सत्य कळल्यानंतर सर्वाना धक्काच बसला

सैन्यात 'जॉईन' होण्यासाठी उत्साहात तरुण आसामला गेले; मात्र सत्य कळल्यानंतर सर्वाना धक्काच बसला

Next
ठळक मुद्देआसाम रायफल्समध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने पैसे मागितले कंधार तालुक्यात तरुणांची फसवणूक आरोपीला दुसऱ्यांदा पोलीस कोठडी

लोहा (जि़ नांदेड) :  यवतमाळ जिल्ह्यातील महेश कदम या व्यक्तीने आसाम रायफल्समध्ये नोकरी लावतो म्हणून लोहा व कंधार तालुक्यांतील अनेक तरुणांची फसवणूक करीत त्यांच्याकडून प्रत्येकी चार लाख, असे एकूण ३६ लाख रुपये हडपले. महेश कदम याने अशा प्रकारे अनेकांना गंडविले. आरोपीला अटक केल्यानंतर दुसऱ्यांदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ 

लोहा तालुक्यातील हाडोळी (ज) येथील सेवानिवृत्त सैनिक भीमराव किशनराव नागरगोजे यांना आपल्या मुलानेही सैन्यात भरती होऊन देशसेवा करावी, अशी इच्छा होती. त्यांचा मुलगा सचिन यानेदेखील सैन्य भरतीसाठी प्रयत्न केला. तथापि, त्याला यश आले नाही. सचिनने आसाम रायफल भरतीसाठी २०१७ मध्ये अर्ज भरला. त्यानुसार तो भरती प्रक्रियेत सहभागी झाला़ तथापि, धावण्याच्या प्रकारात तो वगळल्या गेला. त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी  यवतमाळ जिल्ह्यातील व कळंब तालुक्यातील मेटीखेडा स्थित आरोपी महेश रमेश कदम याचा दूरध्वनी आला. महेश कदम याने सचिन नागरगोजे याला आसाम रायफलमध्ये नोकरीचे काम करून देतो चार लाख रुपये लागतील, असे सांगितले.

नोकरीसाठी सचिनने वडिलांकडे हट्ट केला. मुलाच्या हट्टामुळे वडील भीमराव नागरगोजे यांनी माळाकोळी येथे व महेश कदम याच्याशी चर्चा केली.  ठरल्याप्रमाणे दोन लाख प्रारंभी घेतले व नोकरीचा आॅर्डर आल्यानंतर पुन्हा दोन लाख देण्यात आले. याप्रकरणी माळाकोळी पोलिसांत भीमराव नागरगोजे यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. २९ जुलै रोजी त्यास अटक करून लोहा न्यायालयासमोर उभे केले असता त्यास प्रारंभी १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. १ आॅगस्ट रोजी न्या़ डी. ए. आरगडे यांनी आरोपी महेश कदम याच्या कोठडीत सहा दिवसांची वाढ केली़

आसाम रायफल नोकरीची दिली बनावट ऑर्डर
नागरगोजे यांच्या मुलाला नोकरी लागली. आमच्याही मुलांना नोकरी लागावी म्हणून नातेवाईक व इतर ओळखीतील अनेकांनी भीमराव नागरगोजे यांच्याशी संपर्क साधत महेश कदमची भेट घेतली. सचिनप्रमाणेच इतरांनाही आसाम रायफल नोकरीची बनावट ऑर्डर दिली़ त्यावर शिक्का, सहीदेखील हुबेहूब असल्याने कोणालाही शंका आली नाही. या सर्वांनी कदमकडे चार लाखांप्रमाणे रक्कम दिली. 

घेतलेली रक्कम देण्यास दिला नकार
भरती करण्यात आलेले सर्व जण रुजू होण्यासाठी शिलाँग आसाम येथे गेले. तेव्हा त्यांना सदरील ऑर्डर व त्यावरील शिक्के आणि स्वाक्षरी बनावट असल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे या सर्वांच्या लक्षात आले. घडलेला प्रकार त्यांनी दूरध्वनीवरून कुटुंबियांना सांगितला़ फसवणूक झालेल्या सर्वांनी महेश कदम याला जाब विचारला़ यावेळी महेशने तुमच्यासारखीच माझी पण फसवणूक झाल्याचे सांगत वेळ मारून नेली व रक्कम देण्यास नकार दिला.

Web Title: Excited young men went to Assam after the order of selection in the army; But when they went there, everyone was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.