हॅण्डग्लोव्हज् घालून लाच घेतली तरी सरकारी कर्मचारी अडकणार एसीबीच्या सापळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:04 AM2020-06-03T00:04:16+5:302020-06-03T00:05:42+5:30

हॅण्डग्लोव्हज् ठरणार पुरावा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची करडी नजर

Even if you take bribe by wearing handgloves, government employees will fall into the trap of ACB | हॅण्डग्लोव्हज् घालून लाच घेतली तरी सरकारी कर्मचारी अडकणार एसीबीच्या सापळ्यात

हॅण्डग्लोव्हज् घालून लाच घेतली तरी सरकारी कर्मचारी अडकणार एसीबीच्या सापळ्यात

Next

जितेंद्र कालेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सध्या सरकारी कार्यालयांमध्ये पाच ते दहा टक्के कर्मचारी संख्या आहे. पगार आणि नोकर कपातीच्या काळात लोकांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने हातात ग्लोव्हज् घालून लाचेची रक्कम स्वीकारली तरी तो एक भक्कम पुरावा होऊ शकतो. त्याद्वारेच त्याला पकडता येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आणि रुग्णालय वगळता बहुतांश शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी संख्या आता अत्यल्प केलेली आहे. ती टप्प्याटप्प्याने वाढविली जाणार आहे. त्याचवेळी अनेक खासगी कंपन्यांमधून पगार आणि कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबिले जात आहे. शासकीय कर्मचारी संख्या जशी वाढविली जाईल तशी विविध कामांसाठी या कार्यालयांमध्ये गर्दीही होणार आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांकडून लोकांची अडवणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात दोन लाचेच्या सापळ्यांची नोंद एसीबीकडे आहे. असे असले तरी यापुढे ग्लोव्हज् घालूनही लाचेचे पैसे स्वीकारले जाण्याची शक्यता आहे.

मुळात, एखादी तक्रार आल्यानंतर सापळा लावण्यापूर्वी एसीबीकडून जे पैसे दिले जातात त्या नोटांना अ‍ॅन्थ्रॉसिन पावडर लावली जाते. नोटांची पावडर हाताला लागली की त्यावर अल्ट्राव्हायलेट रेज मारल्यानंतर ती पावडर निळ्या रंगाची दिसते. हाच मोठा पुरावा एसीबीकडे येतो. त्यामुळे आरोपीचे रेकॉर्डिंग आणि पंच याबरोबरच हा पुरावाही ग्राह्य धरला जातो. यापुढे एखाद्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॅण्डग्लोव्हज् घालून पैसे घेतले तरी हे हॅण्डग्लोव्हज् पुरावा म्हणून ताब्यात घेतले जाणार आहेत. त्या वेळी हा पुरावा महत्त्वाचा ठरणार आहे. सापळ्याच्या वेळी हा पुरावा नष्ट करण्याच्या हालचाली झाल्या तरी त्यावर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याची माहिती या अधिकाºयाने दिली.

ठाणे ग्रामीणमधील शहापूरचे उपअधीक्षक दिलीप सावंत यांनी विनयभंगातील एका आरोपीला मदत करण्यासाठी तब्बल ५0 लाखांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अलीकडेच गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची अन्यत्र बदली करण्यात आली. अलिबागमध्ये एका कृषी केंद्राच्या नूतनीकरणासाठी आठ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी कृषी अधिकाºयाला अटक केली.

Web Title: Even if you take bribe by wearing handgloves, government employees will fall into the trap of ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.