कानपूरमध्ये 'भ्रष्टाचारी सिंघम'; एन्काऊंटरची भीती दाखवून जमवले १०० कोटी; वरपर्यंत ओळख असल्याने लोक गप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:31 IST2025-11-05T14:31:35+5:302025-11-05T14:31:56+5:30
उत्तर प्रदेशातील पोलिस उपअधीक्षक असलेले ऋषिकांत शुक्ला यांच्यावर १०० कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे.

कानपूरमध्ये 'भ्रष्टाचारी सिंघम'; एन्काऊंटरची भीती दाखवून जमवले १०० कोटी; वरपर्यंत ओळख असल्याने लोक गप्प
DSP Rishikant Shukla: कानपूरमध्ये स्वत:ला 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' म्हणून मिरवणाऱ्या डीएसपी ऋषिकांत शुक्ला यांच्यावरील कारवाईमुळे उत्तर प्रदेश पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. एसआयटी तपासामध्ये शुक्ला यांच्याकडे १०० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. ही संपत्ती त्यांच्या अधिकृत उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. ऋषिकांत शुक्ला यांनी कानपूरमध्ये असताना एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी प्रतिमा निर्माण करुन भीती दाखवत कमाई केली. पीडितांच्या म्हणण्यानुसार, शुक्ला लोकांना वारंवार एनकाउंटरमध्ये उडवून देण्याची धमकी देत असत आणि याच भीतीचा आधार घेऊन ते लोकांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेत.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला कायदेशीर कारवाईच्या नावाखाली आधी खोटे गुन्हे दाखल करत आणि नंतर तेच प्रकरण मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपये उकळत. मनोहर शुक्ला नावाच्या एका बिल्डरने खुलासा केला की, त्याने ऋषिकांत शुक्ला यांच्यासोबत एक जमीन खरेदी केली होती, जी काही वर्षांत ६० ते ७० कोटींची झाली. जेव्हा बिल्डरने आपला हिस्सा मागितला, तेव्हा ऋषिकांत यांनी त्याला पिस्तूल दाखवून एनकाउंटरची थेट धमकी दिली आणि हिस्सा देण्यास नकार दिला. शुक्ला यांची वरपासून खालपर्यंत चांगली ओळख असल्याने बिल्डरला कायदेशीर मदतही मिळाली नाही.
अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यात लोकांनी भीतीपोटी आपल्या जमिनी, दुकाने किंवा घरे शुक्ला यांच्या सांगण्यावरून त्यांच्या ताब्यात दिली. कानपूरचा चर्चित वकील आणि भूमाफिया अखिलेश दुबे याच्यासोबत ऋषिकांत शुक्ला यांचे अनेक वर्षांपासून साटंलोटं असल्याचे उघड झाले. पोलीस सूत्रांनुसार, दुबे आपल्या कायदेशीर नेटवर्कचा वापर करून लोकांना अडकवत असे आणि शुक्ला आपल्या पोलिसी बळाचा वापर करून त्या खोट्या प्रकरणांना कायदेशीर स्वरूप देत असे. दोघांनी मिळून अनेक लोकांना खोट्या खटल्यांमध्ये फसवले. अनेक प्रकरणांत, ज्या लोकांवर बलात्कार किंवा खंडणीचे गुन्हे दाखल झाले, त्यांच्या नावावर असलेली जमीन नंतर शुक्ला किंवा दुबे यांच्या कंपनीच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचे उघड झाले आहे.
एसआयटी तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अखिलेश दुबे याच्या कंपनीत ऋषिकांत शुक्ला यांची पत्नी प्रभा शुक्ला भागीदार आहे. याच कंपनीच्या माध्यमातून रिअल इस्टेटचा व्यवसाय चालवून काळ्या पैशाला पांढरे केले जात होते. ऋषिकांत शुक्ला यांच्याविरोधात कानपूरमध्ये अनेकदा तक्रारी आल्या, पण त्यांची राजकीय पोहोच आणि मोठ्या नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे प्रत्येक वेळी त्या दाबल्या गेल्या.
२०२४ मध्ये त्यांच्या मुलाचे थाटामाटात झालेल लग्न देखील चर्चेत आले होते. या आलिशान लग्नात कानपूरचे वरिष्ठ अधिकारी, आमदार आणि काही खासदारही उपस्थित होते. या लग्नात झालेला कोट्यवधींचा खर्च तेव्हा पोलीस दलात चर्चेचा विषय ठरला होता, पण तरीही कोणतीही चौकशी झाली नाही. यामुळे शुक्ला यांची बदली झाली, पण तपास पुढे सरकला नाही. भूमाफिया अखिलेश दुबेच्या टोळीवर कारवाई सुरू झाल्यावरच शुक्ला यांचे नाव समोर आले.
१०० कोटींच्या मालमत्तेची लांबलचक यादी
एसआयटीच्या अहवालानुसार, ऋषिकांत शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण १२ ठिकाणी ९२ कोटी रुपयांची मालमत्ता आढळली आहे. यामध्ये लखनऊ, कानपूर, फतेहपूर, इटावा आणि मैनपुरी येथील जमिनी, आलिशान बंगले, फ्लॅट आणि महागड्या गाड्यांचा समावेश आहे. अनेक मालमत्ता अजूनही एसआयटीच्या ताब्यात आलेल्या नाहीत, कारण त्या नातेवाईक आणि मित्रांच्या नावावर खरेदी केल्या गेल्या आहेत.