ED started probe into Swapnali, wife of Minister of State Vishwajeet Kadam | राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली यांची ईडीकडून चौकशी सुरु 

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली यांची ईडीकडून चौकशी सुरु 

ठळक मुद्देआज दुपारपासून त्या ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या असून त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार आज दुपारपासून त्या ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या असून त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

ईडीने या आठवड्यात अविनाश भोसले याच्या पुणे, मुंबई आणि कोल्हापूर येथील कार्यालयांवर छापा मारला. तसेच १० आणि १७ फेब्रुवारी रोजी समन्स बजावून त्याच दिवशी चौकशीसाठी ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. ईडीने १० फेब्रुवारी रोजी बजावलेले समन्स व परकीय चलन नियमन कायद (फेमा) अंतर्गत नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी  पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यांनतर पार पडलेल्या सुनावणीत ईडीने अविनाश व अमित भोसले यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक करणार नाही, असे न्यायालयाला सांगितले. त्यांनतर पुढील सुनावणीत २४ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करणार नाही, असे आश्वासन ईडीने उच्च न्यायालयाला दिले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस पाठवली होती. तसेच ईडीने त्यांची प्राथमिक चौकशीही केली आहे.

 

ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या स्वप्नाली या पत्नी आहेत. तसेच काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या सूनबाई आहेत. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या त्या मुलगी आहेत.

 

Web Title: ED started probe into Swapnali, wife of Minister of State Vishwajeet Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.