दारूच्या नशेत वकिलाचा पोलीस ठाण्यासह रुग्णालयात धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 03:13 AM2019-08-17T03:13:10+5:302019-08-17T03:13:34+5:30

रात्री उशिराने जखमी तरुणाला घेऊन मद्यधुंद अवस्थेत वकील पोलीस ठाण्यात धडकला.

Drunken lawyer Abuse in hospital & police station | दारूच्या नशेत वकिलाचा पोलीस ठाण्यासह रुग्णालयात धिंगाणा

दारूच्या नशेत वकिलाचा पोलीस ठाण्यासह रुग्णालयात धिंगाणा

Next

मुंबई : रात्री उशिराने जखमी तरुणाला घेऊन मद्यधुंद अवस्थेत वकील पोलीस ठाण्यात धडकला. पोलिसाने जखमी तरुणाची चौकशी करत, त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन काढले, सोबतच वकिलालाही जाण्याचा सल्ला दिला. मात्र याच रागात वकिलाने पोलीस ठाण्यात धिंगाणा घालत, पोलिसांनाच धक्काबुक्क्की केली. रात्रभर त्याच्या धिंगाण्याने पोलिसांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणी पवई पोलिसांनी राहुल जमदाडे या वकिलाला अटक केली आहे. यापूर्वीही सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.

पोलीस उपनिरीक्षक विशाल कोरडे यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बुधवारी रात्री सव्वाएकच्या सुमारास जमदाडे हा विजय पवार या तरुणाला घेऊन पोलीस ठाण्यात आला. पवारला स्थानिकांनी मारहाण केल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ सर्व माहिती घेत त्याला पोलीस व्हॅनमधून रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याच दरम्यान सोबतीला म्हणून त्यांनी जमदाडेलाही जाण्यास सांगितले. तेव्हा जमदाडे पोलिसांवर ओरडला, ‘मी वकील आहे, मी घेऊन जाणार का त्याला रुग्णालयात?’ असे बोलत त्यांच्या टेबलाकडे धावत गेला. तो दारूच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. त्याच रागात त्याने पोलिसांना धमकावत, व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केले. पोलिसांनी त्याला अडविले. तरीदेखील तो ऐकत नव्हता. त्यांनी मोबाइल देण्यास सांगितले तेव्हा, त्याने पोलिसांनाच धक्काबुक्की केली.

पोलिसांनी त्याच्याकडील मोबाइल काढून घेत, त्यालाही वैद्यकीय तपासणीसाठी व्हॅनमध्ये बसवले. तेव्हा त्याने पवारच्या मोबाइलवरून पोलीस नियंत्रण कक्षास फोन करून पोलिसांविरुद्धच खोट्या तक्रारी सुरू केल्या. गाडीतही पोलिसांना धक्काबुक्की आणि धमकावणे सुरू होते. तेथून त्याला ट्रॉमा केअर रुग्णालयात आणले. तेथेही त्याने आरडाओरड करत रुग्णालय डोक्यावर घेतले. तेथील डॉक्टरांसोबतही उद्धटपणे बोलत जोरजोरात गाणे बोलण्यास सुरुवात केली. तेथून तपासणी करून पुन्हा पोलीस ठाण्यात नेत असताना त्याने रुग्णालयाचा दरवाजा घट्ट पकडून ठेवला. त्यात बळाचा वापर करत तो दरवाजाच उखडला गेला. त्यात त्याच्याच हाताला दुखापत झाली. पुढे पोलीस हवालदाराच्या पोटात त्याने लाथ मारली. ट्रॉमा केअर ते पवई पोलीस ठाणे येथे वाहनातून येईपर्यंत त्याने पोलिसांना धक्काबुक्की, गाणे गाणे तसेच स्वत:ला दुखापत करून घेण्याचे काम केले. त्यातही त्याने चालत्या वाहनातून दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला. पहाटे साडेचार वाजेपर्र्यंत त्याचा हा धिंगाणा सुरूच होता.

यापूर्वीही अटकेची कारवाई
वकिलाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही त्याला ३५३ च्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. यात त्याला दोषीही ठरविले होते, अशी माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली.

Web Title: Drunken lawyer Abuse in hospital & police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.