दारूने केला विनाश; मामा-भाच्याने केलेल्या मारहाणीत मद्यपी पित्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 06:34 PM2020-12-09T18:34:50+5:302020-12-09T18:36:25+5:30

वडिलांच्या दारू पिण्याला होता विरोध

Destruction caused by alcohol; Alcoholic father killed in mama-nephew beating | दारूने केला विनाश; मामा-भाच्याने केलेल्या मारहाणीत मद्यपी पित्याचा मृत्यू

दारूने केला विनाश; मामा-भाच्याने केलेल्या मारहाणीत मद्यपी पित्याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमामा - भाच्यावर खुनाचा गुन्हा दाखलआरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी :

अंबाजोगाई : वडील सतत दारू पिऊन त्रास देत असल्याने संतापलेल्या मुलाने मामाच्या मदतीने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर झालेल्या वडिलांचा दुसऱ्या दिवशी (दि.०५) मृत्यू झाला. परळी तालुक्यातील वानटाकळी येथील या प्रकरणात मुलासह मामावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात  खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. 
 
विलास रामराव मुंडे (वय ४७, रा. वानटाकळी, ता. परळी) असे मुलाच्या मारहाणीत मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची मुलगी निशिगंधा हिने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे कि, शुक्रवारी (दि.४) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ती, आई, भाऊ ऋषिकेश आणि वहिनी हे सर्व जेवण करून घरात बसले होते. यावेळी तिचे वडील विलास हे दारू प्राशन करून आले आणि घरासमोर उलट्या करू लागले. हे पाहून विलास यांचा मुलगा ऋषिकेशचा पारा चढला. त्याने मामा भागवत साहेबराव हांगे यास बोलावले. दारू पिऊन सतत त्रास का देतोस असे म्हणत त्या दोघांनी विलास यांना लोखंडी पाईप आणि काठीने पाठीवर, पोटावर बेदम मारहाण केली.

यावेळी आई, मुलीने मध्यस्थी करत विलास यांना सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु संताप अनावर झालेल्या मामा-भाच्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी देत बाजूला काढले. थोड्यावेळाने दोघेही तिथून गेले. त्यानंतर जखमी अवस्थेतील विलास यांनी संपूर्ण रात्र बाजूच्याच गिरणीत काढली. दुसऱ्या दिवशी (दि.५) सकाळी ६ वाजता निशिगंधाने वडिलांना चहा दिला आणि त्यांची अवस्था पाहून रुग्णालयात जायचे का असे विचारले. परंतु, विलास यांनी त्यास नकार दिला. दुपारी २ वाजताच्या सुमारास विलास यांची तब्येत अधिकच खालावली. त्यामुळे पत्नी शिवकन्या आणि मोठा मुलगा विकास यांनी त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे दुपारी ०३.५५ वाजता डॉक्टरांनी विलास यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतरही दोन्ही आरोपींनी झालेल्या घटनेबद्दल कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी कुटुंबियांना दिली. तरीदेखील निशिगंधाने हिम्मत करून पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून ऋषिकेश विलास मुंडे आणि भागवत साहेबराव हांगे या मामा-भाच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पीएसआय व्ही.बी. केंद्रे करत आहेत.
 
सहा दिवसांची पोलीस कोठडी :
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताबडतोब अटक केली. त्यांना बुधवारी (दि.९) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Destruction caused by alcohol; Alcoholic father killed in mama-nephew beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.