नागपुरात सायबर गुन्हेगाराकडून विद्यार्थ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:31 PM2020-02-22T23:31:57+5:302020-02-22T23:37:46+5:30

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासोबत २० हजारांत अ‍ॅक्टिव्हा विकत देण्याचा ऑनलाईन सौदा करून सायबर गुन्हेगाराने त्याच्याकडून ८३,५८० रुपये उकळले.

Cyber criminals cheat student in Nagpur | नागपुरात सायबर गुन्हेगाराकडून विद्यार्थ्याची फसवणूक

नागपुरात सायबर गुन्हेगाराकडून विद्यार्थ्याची फसवणूक

Next
ठळक मुद्दे२० हजारांत अ‍ॅक्टिव्हा विकत देण्याचा सौदा : ८४ हजार हडपूनही दुचाकी दिलीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासोबत २० हजारांत अ‍ॅक्टिव्हा विकत देण्याचा ऑनलाईन सौदा करून सायबर गुन्हेगाराने त्याच्याकडून ८३,५८० रुपये उकळले. नवीन दुचाकीच्या किमतीएवढी रक्कम हडपूनही आरोपीने त्याला दुचाकी दिलीच नाही. उलट पुन्हा पुन्हा त्याला आपल्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगून रडकुंडीला आणले. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा गुन्हा चार महिन्यानंतर पोलिसांकडे दाखल झाला.
सुमनराज राजअन्ना अंकारी (वय २२) हा भोपाळ येथील रहिवासी असून तो प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतो. सुमनराज हिंगण्याला भाड्याच्या खोलीत राहतो. महाविद्यालयात जाण्यासाठी त्याला दुचाकीची गरज असल्याने तो ओएलएक्सवर दुचाकी शोधत होता. २८ ऑक्टोबर २०१९ ला रात्री त्याला आशिष खंडेलवाल (नागपूर) नामक व्यक्तीची अ‍ॅक्टिव्हा २० हजारात विकायची आहे, असे दिसले. तेथे नमूद कथित खंडेलवालच्या ६२६५ ८४९४०८ क्रमांकावर सुमनराजने संपर्क केला. त्यावेळी आरोपीने त्याला आपण आर्मीत असून एअरपोर्टवर सेवारत असल्याचे सांगितले. २० हजारात अ‍ॅक्टिव्हाचा सौदा केल्यानंतर आरोपीने सुमनराजला आधी आर्मी ट्रान्सपोर्ट पेटीएम ९१८४२ ६८९१३८३ हा खातेक्रमांक देऊन त्यात १ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानंतर सुमनराजला २९ ऑक्टोबरला मंगलमूर्ती चौकात बोलविले. ठरल्यावेळेप्रमाणे सुमनराज तेथे गेला मात्र कथित आरोपी खंडेलवाल बराच वेळ होऊनही तेथे आला नाही. त्यामुळे सुमनराजने त्याला फोन केला. एअरपोर्टमधून वाहन बाहेर काढण्यासाठी २०२० रुपये जमा करावे लागतील, असे सांगून ते गुगल पे मार्फत स्वत:च्या खात्यात भरण्यास सुमनराजला बाध्य केले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने ९०९८४ ६९८१४ हा मोबाईल क्रमांक प्रवीणकुमार याचा आहे, असे सांगून त्याच्याशी बोलण्यास सांगितले. आरोपी प्रवीणकुमारने २० हजार रुपये जमा केल्याशिवाय गाडी मिळणार नाही, असे सांगितले. आधीच ३०२० रुपये जमा केल्यामुळे सुमनराजने आरोपीने सांगितल्याप्रमाणे पुन्हा ९१८४२ ६८९१३८३ क्रमांकाच्या खात्यात पुन्हा गुगल पे मार्फत १७ हजार रुपये जमा केले.
त्यानंतरही आरोपींनी सुमनराजला वेगवेगळे कारण सांगून एकूण ८३, ५८० रुपये जमा करण्यास बाध्य केले. अवघ्या २० हजारात दुचाकीचा सौदा करणारे आरोपी ८३, ५८० रुपये घेऊनही पुन्हा पुन्हा रक्कम जमा करण्यास सांगत असल्याने सुमनराज रडकुंडीला आला.

रक्कम परत हवी असेल तर पुन्हा रक्कम दे !
आरोपींनी नवीन दुचाकीच्या किमतीएवढी रक्कम उकळल्याने, सुमनराजने त्यांना गाडी नको, आपले पैसे परत करा, असे म्हटले. निर्ढावलेल्या आरोपींनी ते परत हवे असेल तर पुन्हा काही रक्कम जमा करावी लागेल, असे सांगितले. त्याने ही बाब मित्रांना सांगितल्यानंतर आरोपीं धोकेबाजी करीत असल्याची बाब पुढे आली. परिणामी सुमनराजने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

 

Web Title: Cyber criminals cheat student in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.