उल्हासनगरात बालविवाहाचे फुटले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:27 AM2021-03-04T05:27:51+5:302021-03-04T05:27:59+5:30

पोलिसांची सतर्कता; नवऱ्या मुलासह सहा जणांवर गुन्हा दाखल

Bing of child marriage erupts in Ulhasnagar | उल्हासनगरात बालविवाहाचे फुटले बिंग

उल्हासनगरात बालविवाहाचे फुटले बिंग

Next



सदानंद नाईक 
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील मोर्यानगरी येथे १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या विवाहाचे बिंग पोलिसांच्या सतर्कतेमुळे फुटले असून अल्पवयीन नवरी मुलीची रवानगी सासरऐवजी महिला बाल विभागाच्या होस्टेलमध्ये करण्यात आली. नवऱ्या मुलासह नवरीचे आई, वडील व लग्न लावून देणारा धर्मगुरू यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्याप्रमाणे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ मधील मोर्यानगरी परिसरातील साई विहार रेसिडेन्सीच्या आवारात अल्पवयीन मुलीचे लग्न रविवारी दुपारी होत असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात यांना मिळाली होती. याची गंभीर दखल घेऊन थोरात यांनी त्वरित पोलीस पथकासह लग्नमंडप गाठला. त्यांनी नवरा मुलगा व नवरी मुलीला वय विचारले असता, नवरा मुलाचे वय २७ तर  मुलीचे वय अवघे १३ वर्षांचे असल्याचे उघड झाले. या प्रकाराने पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात आणून नवरी बालवधूची रवानगी सासरऐवजी शहरातील महिला बाल विभागाच्या होस्टेलमध्ये केली. तर नवरा मुलगा अभिजित राजगुरू, वडील गौतम राजगुरू, आई सुनीता राजगुरू तसेच नवरी बालवधूचे वडील राहुल देवकर, आई सविता देवकर व लग्न लावून देणारे रमेश साळवे यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
सुशिक्षित कुटुंबामध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याच्या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे. लग्न लावून देणाऱ्या धर्मगुरूंनी तरी याबाबत सतर्क राहावे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराने धूमधडाक्यात सुरू असलेल्या लग्न मंडपात शांततेचे सावट पसरले. तर लग्नाला आलेल्या मंडळींनी कारवाईच्या भीतीने आपापल्या घरी जाणे पसंत केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Bing of child marriage erupts in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.