काश्मिरी तरुणांवर हल्ला, 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला लावल्या, मुख्यमंत्र्यांनी दिल्या कारवाईच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 11:54 AM2021-11-29T11:54:24+5:302021-11-29T11:54:38+5:30

काश्मिरी तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी रांची पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Attack on Kashmiri youth, chanting of 'Jai Shri Ram', instructions for action given by the Chief Minister | काश्मिरी तरुणांवर हल्ला, 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला लावल्या, मुख्यमंत्र्यांनी दिल्या कारवाईच्या सूचना

काश्मिरी तरुणांवर हल्ला, 'जय श्री राम'च्या घोषणा द्यायला लावल्या, मुख्यमंत्र्यांनी दिल्या कारवाईच्या सूचना

Next

रांची:झारखंडची राजधानी रांचीमध्ये हिवाळ्यातील गरम कपडे विकण्याचे काम करणाऱ्या 4 काश्मिरी तरुणांना काही स्थानिक लोकांनी मारहाण करून जबरदस्तीने 'जय श्री राम' आणि 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा देण्यास भाग पाडले आहे. या घटनेनंतर काश्मिरी तरुणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दोषींना सोडले जाणार नाही

रांचीचे पोलिस अधीक्षक सुरेंद्र कुमार झा यांना या घटनेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, शनिवारी काश्मिरी व्यावसायिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, त्यांच्यावर काही स्थानिक लोकांनी मारहाण केली. त्यानंतर रात्री पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

सीएम सोरेन यांनी कारवाईच्या सूचना दिल्या

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वत: पीडित तरुणाचा व्हिडिओ ट्विट करुन आरोपींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आरोपानुसार, काही स्थानिक लोकांनी मिळून आधी या भागात राहणाऱ्या काश्मिरी तरुणांना मारहाण केली आणि नंतर त्यांना ‘जय श्री राम’ आणि 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा देण्यास भाग पाडले.  

एफआयआर नोंदवण्यात आला आहे

पोलिस उपअधीक्षक प्रभात रंजन यांनी सांगितले की, पोलिस स्टेशन स्तरावर सर्व काश्मिरी तरुणांची यादी तयार केली जाईल आणि नंतर ती संबंधित स्टेशन प्रभारींना दिली जाईल. तसेच, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पाऊले उचलली जातील. शहरात काही समाजकंटक असून ते कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देतात. परंतु, अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाची टीम पूर्णपणे सक्षम आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Attack on Kashmiri youth, chanting of 'Jai Shri Ram', instructions for action given by the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.