भामट्याने केली अलिबागच्या तहसीलदारांचीच फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 11:28 PM2020-09-13T23:28:47+5:302020-09-13T23:29:06+5:30

तालुक्यातील वेलटवाडी गावचा पुनर्वसन आराखडा तयार करून त्याने लोकांची आर्थिक फसवणूक केली असून, त्याच्यावर औरंगाबाद, कर्जत, मुंबईसह गुजरातमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

Alibag tehsildar cheated by vagrant | भामट्याने केली अलिबागच्या तहसीलदारांचीच फसवणूक

भामट्याने केली अलिबागच्या तहसीलदारांचीच फसवणूक

Next

अलिबाग : चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, मदतीच्या नावाखाली एका भामट्याने अलिबागच्या तहसीलदारांचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील वेलटवाडी गावचा पुनर्वसन आराखडा तयार करून त्याने लोकांची आर्थिक फसवणूक केली असून, त्याच्यावर औरंगाबाद, कर्जत, मुंबईसह गुजरातमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीनंतर या भामट्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून, न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
३ जूनला रायगडला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. अलिबाग तालुक्यात घरे, बागायती, शेतींचे मोठे नुकसान झाले. आपाद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी, मोडलेले संसार उभे करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था व व्यक्ती पुढे आल्या. त्यांनी अन्नधान्य, औषधे व इतर साहित्याचे वाटप केले. मात्र, मदतीच्या नावाखाली डॉ.साजिद सैय्यद नामक भामटाही अलिबाग तहसील कार्यालयात आला. त्याने आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरम या संस्थेचा अध्यक्ष असल्याचे तहसीलदारांना सांगितले. मी लंडन येथून पीएच.डी केली आहे, तसेच यापूर्वी अनेक ठिकाणी गरजू व गरीब लोकांना मदतीचे वाटप केल्याचेही त्याने सांगितले. सुरुवातीला त्याने काही लोकांना मास्क, सॅनिटायझर आदी साहित्याचा पुरवठा केला, तसेच तालुक्यातील मौजे वेलटवाडी येथील आदिवासी बांधवांचे पुनर्वसन करतो, असे सांगितले. त्याकरिता डॉ.साजिद सैय्यद याने एक पुनर्वसन प्रकल्प आराखडा तयार केला. तो दाखवून त्याने पुणे येथील काही लोकांची आर्थिक फसवणूक केली. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी तहसील कार्यालयांतर्गत वॉररूम व मोबाइल अ‍ॅप विकसित करून देत असल्याचे सांगत, त्याने सर्वांचा विश्वास संपादन केला आणि आपला डाव साधला.
अलिबाग शहरातील फार्मासिटीकल डिलर, फर्निचर डिलर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात साहित्य उधारीवर उचलले, तसेच खोट्या लेटर पॅडवर डॉक्टरांची नियुक्ती केली. त्याच्या या एकंदरीत कृतीबाबत संशय आल्याने तहसीलदार सचिन शेजाळ यांनी त्याच्याबद्दलची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, तो भामटा असल्याचे स्पष्ट झाले.
डॉ. सैय्यद याच्या जुन्या क्राइम रेकॉर्ड तपासणीत त्याच्याविरोधात बांद्रा पोलीस ठाणे, जुहू पोलीस ठाणे, पंतनगर पोलीस ठाणे, गुजरात येथील करंज पोलीस ठाणे, तसेच इतरही अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तहसीलदार सचिन शेजाळ यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे.

सावध राहण्याचे आवाहन

- डॉ. साजिद सैय्यदला अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता, १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, १६ सप्टेंबर रोजी पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. त्याने औरंगाबाद, कर्जत व मुंबई येथेही अशाच प्रकारे लोकांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्याच्यापासून सावध राहण्याचे आवाहन तहसीलदार शेजाळ यांनी केले आहे.

Web Title: Alibag tehsildar cheated by vagrant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.