डॉक्टरकडून खंडणी वसूल केल्या प्रकरणी पोलिसांसह आठ जणांवर मोक्का कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 03:18 PM2020-07-02T15:18:32+5:302020-07-02T15:18:42+5:30

हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ७ लाख रुपये खंडणी उकळण्यात आली होती.

Action of Mocca act on eight people including police in ransom case | डॉक्टरकडून खंडणी वसूल केल्या प्रकरणी पोलिसांसह आठ जणांवर मोक्का कारवाई

डॉक्टरकडून खंडणी वसूल केल्या प्रकरणी पोलिसांसह आठ जणांवर मोक्का कारवाई

Next
ठळक मुद्देडॉक्टर खंडणी प्रकरण : सुत्रधार महिलेवर ५ गुन्हे

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी समीर थोरात याच्यावर ८ जणांवर खंडणी प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी समीर थोरात याच्या जामीनावर गुरुवारी न्यायालयात होती. या सुनावणीच्या वेळी पोलिसांनीडॉक्टरांना खंडणी मागून त्यांच्याकडून ७ लाख रुपये उकळणाऱ्या या टोळीतील ८ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने समीर थोरात याचा जामीन फेटाळून लावला. 
हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ७ लाख रुपये खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. त्यात पोलीस कर्मचारी समीर थोरात, स्वयंघोषित पत्रकार प्रदीप फासगे, सामाजिक कार्यकर्ता कैलास ऊर्फ भागूदास अवचिते, आरती चव्हाण यांना अटक केली आहे़. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार रंजना वणवे, सागर राऊत, महेश पवार, किरण माकर (सर्व रा. बारामती) हे फरार आहेत. 
याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले की, रंजना वणवे ही या टोळीची मुख्य सुत्रधार असून तिच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. ती प्रत्येक वेळी गुन्हा करताना वेगवेगळ्या लोकांचा वापर करते. यापूर्वी तिला बार्शी येथे अशाच प्रकारे डॉक्टरांकडून खंडणी वसुल केल्याप्रकरणात अटक केली होती. तेथे तिच्यावर मोक्का अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. हे सर्व त्या टोळीमध्ये सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी मोक्का कारवाईला १ जुलै रोजी मंजुरी दिली आहे. 
याबाबत समीर थोरात यांच्यावतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीविरुद्ध यापूर्वी एकही गुन्हा नसल्याने त्यास मोका कायदा लागू होत नाही. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे अ‍ॅड़ ठोंबरे यांनी सांगितले.

Web Title: Action of Mocca act on eight people including police in ransom case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.