मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 07:21 PM2021-12-02T19:21:49+5:302021-12-02T19:23:26+5:30

Accident Case : सूर्यकांत पाटील (५०) व जयश्री पाटील (४५, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असे अपघातात मयत झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

Accident while distributing child marriage invitation; Parents killed on the spot | मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार

मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार

Next

भालकी (जि. बीदर) : मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन गावाकडे परतताना अपघात होऊन पती- पत्नी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री बीदर - उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ घडली.

सूर्यकांत पाटील (५०) व जयश्री पाटील (४५, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असे अपघातात मयत झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या विवाहाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी सूर्यकांत पाटील व त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघे बुधवारी बिदरला गेले होते. तिथे पत्रिका वाटप करुन रात्री उशिरा भालकीकडे परतत होते. तेव्हा बीदर- उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ त्यांची जीप उलटून अपघात झाला. त्यात दोघेही जागीच ठार झाले.

मुलाने संपर्क साधला मात्र...

दरम्यान, आई- वडिलांस येण्यास वेळ का लागत आहे, म्हणून मुलगा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, मोबाईल लागत नव्हता. त्यामुळे मुलाने व घरातील इतर मंडळींनी रात्रभर वाट पाहिली. दरम्यान, गुरुवारी सकाळी रस्त्याच्या बाजूस कार उलटून अपघात झाल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यामुळे घरातील मंडळींनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली असता दोघेही ठार झाल्याचे निदर्शनास आले.

आ.ईश्वर खंड्रे यांची घटनास्थळी भेट...

या अपघाताची माहिती समजताच भालकीचे आमदार ईश्वर खंड्रे व पोलीस अधिका-यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत दोघांवरही मेथी मेलकुंडा वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सूर्यकांत पाटील हे ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व भावंडे असा परिवार आहे.

Web Title: Accident while distributing child marriage invitation; Parents killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.