Abduction and murder case: High court acquitted of death sentence | अपहरण व हत्या प्रकरण : फाशीची शिक्षा ठोठावलेल्याची उच्च न्यायालयाने केली सुटका
अपहरण व हत्या प्रकरण : फाशीची शिक्षा ठोठावलेल्याची उच्च न्यायालयाने केली सुटका

मुंबई : मालकाच्या १२ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याबद्दल गेल्या वर्षी सत्र न्यायालयाने इम्तियाज शेख याला फाशीची शिक्षा तर अन्य एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयाने या दोघांची बुधवारी सुटका केली.

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २७ मे २०१२ रोजी आरोपींनी मुंबईतील धारावी येथून एका १२ वर्षीय मुलाचे अपहरण केले आणि त्याच दिवशी त्याची हत्या केली. मुलाची हत्या करूनही आरोपींनी त्याच्या वडिलांकडून२५ लाख रुपये खंडणी मागितली. त्यांना अटक करेपर्यंत ते मुलाच्या वडिलांना खंडणीसाठी फोन करीत होते.

मुलाचे वडील राजेश भांडगे यांचे धारावी येथे एम्ब्रायडरीचे युनिट होते. तिथे इम्तियाज शेख काम करत होता. मात्र, शेख काम चांगले करत नसल्याने भांडगे यांनी त्याला घटनेच्या आठ महिन्यांपूर्वीच कामावरून काढून टाकले. त्याचा राग म्हणून शेखने राजेश यांच्या १२ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केली, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

गेल्या वर्षी सत्र न्यायालयाने शेख याला फाशीची तर सहआरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात दोघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलावरील सुनावणी न्या. बी.पी. धर्माधिकारी व न्या. सपना जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.
न्यायालयाने या दोघांचा अपील मंजूर करीत या दोघांचीही सुटका केली. ‘सरकारी वकील दोघांवरील आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत,’ असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

‘प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही’
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खंडणीकरिता फोन करण्यासाठी वापरलेले सिम कार्ड या प्रकरणातील मुख्य आरोपी इम्तियाज शेख याच्याकडून जप्त करण्यात आले. तसेच या घटनेतील चारही आरोपी सतत एकमेकांच्या संपर्कात असल्याचे कॉल डाटा रेकॉर्डवरून सिद्ध झाले आहे. मात्र, उच्च न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मान्य केले नाही. ‘कॉल डाटा रेकॉर्डवरून हे आरोपी सतत एकमेकांच्या संपर्कात होते, हे सिद्ध होत नाही. या प्रकरणी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही,’ असे म्हणत न्यायालयाने दोघांची सुटका केली. तर अन्य दोन आरोपी इसरार शेख आणि ए. अहमद यांची सत्र न्यायालयानेच पुराव्यांअभावी सुटका केली आहे.

Web Title: Abduction and murder case: High court acquitted of death sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.